वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर आता या निर्णयाविरोधातील नेत्यांच्या राजीनामासत्राला सुरुवात झालीये. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधामध्ये आंध्र प्रदेशातून आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांच्यासह केंद्रीय पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी आपले राजीनामे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे पाठविले. त्यांच्यासोबत रेल्वे राज्यमंत्री के.जे.सूर्यप्रकाश रेड्डी, पेट्रोलीयम राज्य मंत्री पनबका लक्ष्मी यांनीदेखील त्यांचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवला आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून दुःख वाटल्यामुळे राजीनाम्याचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचे पल्लम राजू म्हणाले. दरम्यान, तेलंगणाच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी देताच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या व रायलसीमा भागातील १३ जिल्ह्यांमध्ये तणाव वाढला आहे. सुरक्षेच्या कारणावरून या भागांमध्ये पोलिस व निमलष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
रायलसीमा भागातील बरेच लोक शुक्रवारी रस्त्यावर उतरून वेगळ्या तेलंगणाला विरोध दर्शवित आहेत. संपूर्ण राज्यभर बंद सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला तेलंगणाच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळताच तेलंगणा समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तेलंगणा समर्थकांनी बऱ्याच ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
“शेवटी ६५ दिवसांच्या कुतूहलानंतर तेलंगणा निर्मितीची प्रक्रिया पुढे सरकली आहे. आम्ही शांततेमध्ये या घटनेचे स्वागत करतो व लोक शांततेमध्ये आपला आनंद व्यक्त करतील, अशी अपेक्षा करतो,” असे तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के.टी.रामाराव म्हणाले.
वेगळ्या तेलंगणाविरोधात सिमांध्रातील मंत्र्यांचे राजीनामे
वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर आता या निर्णयाविरोधातील नेत्यांचा राजीनामासत्राला
First published on: 04-10-2013 at 10:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: United andhra leaders call for bandh today as cabinet clears telangana formation