पीटीआय, संयुक्त राष्ट्र
लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानस्थित उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हा भारताच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे.मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून काळय़ा यादीत टाकण्याचा भारत व अमेरिकेचा संयुक्त प्रस्ताव चीनने १६ जून २०२२ रोजी रोखला होता. त्यानंतर सात महिन्यांनी हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद प्रतिबंधक समिती १२६७ आयएसआयएल आणि अल कायदा प्रतिबंध समितीने ६८ वर्षीय मक्की याला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले.मक्की हा जमात अल दवा आणि लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय व्यवहारांचा प्रमुख आहे. तो लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदचा नातलग आहे.
भारताकडून निर्णयाचे स्वागत
नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर ए तैयबाचा म्होरक्या अब्दुल रेहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. जागतिक समुदायाने दहशतवादाच्या उपद्रवाविरुद्ध ठोस भूमिका घ्यावी यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही भारताने दिली आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची म्हणाले की, भारतीय उपखंडात दहशतवादाचा मोठा धोका कायम असून तो कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध उपयुक्त ठरणार आहेत. दहशतवाद्यांना कोणतीही दयामाया न दाखविण्याचे भारताचे धोरण आहे.