वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
सुमारे सहा महिन्यांपूर्वी मॅनहॅटनमधील न्यायालयात एका गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना ‘टाइम्स पर्सन ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे मॅनहॅटनमधील न्यायालयापासून काही अंतरावर न्यूयॉर्क भांडवली बाजारामध्ये सुरुवातीचा घंटानाद ते करणार आहेत. दरम्यान, घोषणेपूर्वीच ट्रम्प यांच्या निवडीची पुष्टी करण्यास ‘टाइम्स’ने नकार दिला आहे.
उद्याोगपती ते राजकारणी बनलेले डोनाल्ड ट्रम्प हे न्यूयॉर्कमधील त्यांच्या प्रेम आणि द्वेषपूर्ण नातेसंबंधातील नव्या अध्यायाचे प्रतिनिधित्व करतात. चार वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास नकार देणाऱ्या ट्रम्प यांनी यंदा नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत उल्लेखनीय पुनरागमन केले आहे. ट्रम्प यांच्या योजनांची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रेडिंगची औपचारिक सुरुवात करण्यासाठी ट्रम्प वॉल स्ट्रीटवर जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना गुरुवारी टाइमच्या ‘२०२४ पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले जाणार असल्याचे परिचित व्यक्तींनी सांगितले.
हेही वाचा : राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ, कामकाज तहकूब; काँग्रेस, भाजपचे आरोप-प्रत्यारोप
पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांना यापूर्वी २०१६ मध्ये ‘टाइम्स पर्सन ऑफ दी इयर’ने सन्मानित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस, एलॉन मस्क, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, प्रिन्सेस ऑफ वेल्स केट आदींसह ट्रम्प यांचा या वर्षीच्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत समावेश करण्यात आला होता.