फैजाबाद येथील गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, असा दावा अनेकांनी केल्याने ते नक्की कोण होते हे हुडकून काढण्यासाठी एक समिती नियुक्त करण्याबाबत विचार करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला.याबाबत दोन स्वतंत्र रिट याचिका करण्यात आल्या होत्या, त्यावर न्या. देवीप्रसाद सिंग आणि न्या. वीरेंद्र कुमार दीक्षित यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यापैकी एक याचिका नेताजींची पुतणी ललिता बोस आणि अन्य दोघांनी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करण्याचा विचार करावा, असा आदेश राज्य सरकारला देण्यात आला आहे. सदर गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हे फैजाबादच्या राम भवनात वास्तव्याला होते आणि १८ सप्टेंबर १९८५ रोजी त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाबाबतचा निर्णय लवकरच म्हणजे शक्यतो तीन महिन्यांत घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. फैजाबाद येथे एक पुराणवस्तू संग्रहालय स्थापन करावे आणि त्यामध्ये गुमनामी बाबांच्या वस्तू आणि अन्य प्राचीन वस्तू शास्त्रोक्त पद्धतीने एका पात्र व्यक्तीच्या देखरेखीखाली जतन कराव्यात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Story img Loader