पतीनं प्रौढ पत्नीशी तिच्या संमतीशिवाय ठेवलेले लैंगिक संबंध मग ते अनैसर्गिक संबंध असले तरी ते गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. छत्तीसगडच्या जगदलपूर येथील एका व्यक्तीला बलात्कार आणि इतर आरोपींखाली अटक करण्यात आली होती. या आरोपीला आता न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा मिळाला आहे. सदर आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर २०१७ साली बस्तर जिल्हा न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक संबंध) आणि ३०४ (मनुष्यवधासाठी जबाबदार) नुसार दोषी मानले होते.

हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यावर सुनावणी पार पडली. १९ नोव्हेंबर रोजी या खटल्याची सुनावणी संपल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आपला निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या एकलपिठाने सांगितले की, जर पत्नीचे वय १५ वर्षांहून कमी नसेल आणि पतीनं पत्नीबरोबर लैंगिक संबंध ठेवले असतील तर त्याला बलात्कार मानता येणार नाही.

नेमके प्रकरण काय आहे?

११ डिसेंबर २०१७ साली जगदलपूर येथे राहणाऱ्या आरोपीला त्याच्या पत्नीच्या जबाबानंतर अटक करण्यात आली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविल्यानंतर आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. आपल्या इच्छेविरोधात पतीनं अनैसर्गिक संबंध ठेवले असल्याची तक्रार पत्नीनं कुटुंबियांकडे केली होती. पतीनं अनैसर्गिक संबंध ठेवल्यामुळे आपण आजारी पडलो असल्याचे पत्नीनं मृत्यूपूर्वी जबाबात म्हटले होते.

११ फेब्रुवारी २०१९ रोजी जगदलपूरचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी बलात्काराच्या आरोपाखाली पतीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यानंतर आरोपीने सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले की, पीडित महिलेच्या जबाबाशिवाय आरोपीविरोधात कोणताही पुरावा नाही. तरीही आरोपीवर अनेक कलमे दाखल करण्यात आली आहेत.

Story img Loader