पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निमलष्करी दलाच्या ७० तुकड्या, १५ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण दिल्लीवर ड्रोन आणि ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सायबर तज्ज्ञ यावर लक्ष ठेवून असतील. प्रजासत्ताक दिनासाठी बहुस्तरावरील सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. सहा स्तरांवर तपासणी होणार आहे. याखेरीज, बहुस्तरीय बॅरिकेड बसविण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हजारो सीसीटीव्ही विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. कॅमेरा डेटाशी जोडण्यात आले असून, एखादा गुन्हेगार कॅमेऱ्याने टिपला, तर त्याची सर्व माहिती पोलिसांना तत्काळ कळणार आहे.
विविध सुरक्षा संस्थांबरोबर पोलिस सुरक्षेची चाचणी करीत आहेत. सर्व जिल्ह्यांचे पोलिस उपायुक्तांना सुरक्षेचे सादरीकरण केले आहे. पोलिसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी चार हजार उंचावरील ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.