Unprovoked Firing at Loc : काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्यांकडून मध्यरात्री विनाकारण गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, आतापर्यंत या चकमकीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नियंत्रण रेषेवरील विविध ठिकाणी गोळीबार झाला आहे. तर, भारतीय सैन्यानेही याविरोधात बचावात्मक कारवाई करावी केली. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की भारतीय सैन्याने परिस्थितीनुसार योग्य प्रतिसाद दिला आणि सीमा सुरक्षा अबाधित ठेवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर शुक्रवारीही पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली.
तर, बंदिपोरा येथे लष्कर ए तालिबासंबंधित एक दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत ठार झाला आहे. अलताफ लल्ली असं त्याचं नाव असून त्याने लष्कर ए तलिबाचे कपडे परिधान केले होते. तसंच, अजस जिल्ह्यातील कुलनार येथे झालेल्या चकमकीत भारताचे दोन जवान जखमी झाले आहेत. या जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी तिथे शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर येथे चकमक घडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर हाय अलर्टवर असून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध ठिकाणी शोधमोहिम सुरू केली आहे. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी उत्तरेकडील मुख्यालयाची येथील सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी उधमपूर येथे आले होते.
संशयित दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन
पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्यांनंतर, या हत्येत सहभागी असलेल्या पाच ते सहा दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्यामागे संशयित असलेल्या आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या तीन संशयितांचे फोटो जारी केले आहेत. त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल विश्वसनीय माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.