Unnecessary Attention of Unscrupulous People : आसाममधील सिलाचर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाने बुधवारी महिला कर्मचाऱ्यांसाठी काढलेले परिपत्रक मागे घेतले. या परिपत्रकानुसार कर्तव्यावर असताना भावनिकरित्या कठोर राहण्याचं आवाहन करण्यात आल होतं. तसंच, अनावश्यकरित्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं लक्ष तुमच्याकडे जाईल असं वर्तन ठेवू नका, असं या परिपत्रकात म्हटलं होतं. परंतु, हे परिपत्रक आता मागे घेण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कोलकाता येथील आर. जे. कार वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यामुळे देशभर संतापाचे वातावरण आहे. देशभरातील सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून या कृत्याविरोधात निषेध केला. तर, आसाममधील रुग्णालयाने महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याकरता परिपत्रकच काढले. परंतु, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ महिला डॉक्टरांना लक्ष्य करणारे परिपत्रक रुग्णालय प्रशासनाने काढल्याने इतर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
रुग्णालय प्रशासनाच्या परिपत्रकात काय म्हटलंय?
“कर्तव्यावर असताना तुम्ही भावनिकरित्या कठोर असलं पाहिजे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबत जागृक राहून लोकांशी बोलताना नम्रतेने संवाद साधला पाहिजे. जेणेकरून वाईट प्रवृत्तीची माणसे तुमच्याकडे आकर्षित होणार नाहीत”, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.
कनिष्ठ डॉक्टर असोसिएशनने या परिपत्रकाविरोधात निदर्शने केली. रुग्णालयातील महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यास रुग्णालय अपयशी ठरले असून महिला डॉक्टरांना लक्ष्य केलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं. एका निवेदनात असोसिएशनने महिला सदस्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाकडे कारवाई करण्यायोग्य मागण्या केल्या आहेत. यामध्ये सर्व रुग्णालयाच्या भागात कार्यरत प्रकाश व्यवस्था करणे; रुग्णालय आणि वसतिगृह परिसरात चोवीस तास सुरक्षा; इतर कर्मचारी, परिचर आणि रुग्णांना प्रवेश नसलेल्या ठिकाणी डॉक्टरांसाठी पाण्याची सोय असलेली योग्य स्वच्छतागृह”; मुख्य गेट, इमर्जन्सी वॉर्ड आणि हॉस्टेल एरिया यांसारख्या पॉईंटवर अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली.
कोलकाता येथील प्रकरणात तरुणीवर सामूहिक बलात्कार?
कोलकाता येथील ज्युनियर महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असून वैद्यकीय क्षेत्रातूनही यावर निषेध केला जातोय. कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोला चौकशीचे आदेश दिले आहेत. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, आता एका डॉक्टरने दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत. अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल वाचला आहे. या शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगात १५१ मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे, असं गोस्वामी म्हणाले. तसेच ही माहिती सांगत गोस्वामी यांनी तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd