Unseasonal Rain : बिहार आणि उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. एकीकडे तीव्र उष्णता तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा कहर असं चित्र देशातील विविध भागात पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात आणि बिहारमधील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि वादळ वाऱ्यामुळे घडलेल्या घटनांमध्ये ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच बिहारमध्ये वादळामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांत गारपीट झाली, तसेच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तसेच उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्यामुळे तेथेही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, याबाबत बिहारच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनानुसार, नालंदा येथे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सिवानमध्ये दोघे, कटिहार, दरभंगा, बेगुसराय, भागलपूर आणि जहानाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
बिहारमधील राजद नेते तेजस्वी यादव यांनी एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये बिहारमधील पावसाच्या घटनेशी संबंधित दावा केला आहे की राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, “बिहारमध्ये वादळ, पाऊस, वीज पडणे, झाड आणि भिंत कोसळणे या विविध घटनांमध्ये ५० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मला खूप दुःख झालं आहे. मी माझ्या मनातील संवेदना व्यक्त करतो. या दुःखात देव आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शक्ती देवो”, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
बिहार में आंधी, तूफान, बारिश, वज्रपात, वृक्ष व दीवार गिरने की विभिन्न घटनाओं में हुई 50 से अधिक दुखद मौतों से मर्माहत हूँ। सभी मृतकों के प्रति गहरी शोक संवेदना व्यक्त करता हूँ। ईश्वर आपदा से प्रभावित परिवारों को दुःख की इस घड़ी में संबल प्रदान करें।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) April 10, 2025
बिहार सरकार से माँग है कि वह…
बिहारच्या अनेक जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने बिहारच्या अनेक जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये दरभंगा, पूर्व चंपारण, गोपालगंज, पश्चिम चंपारण, किशनगंज, अररिया, सुपौल, गया, सीतामढी, शेओहर, नालंदा, नवाडा आणि पाटणा या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वीज कोसळल्याने किमान २२ जणांचा मृत्यू झाला. फतेहपूर आणि आझमगड जिल्ह्यात प्रत्येकी तीन, फिरोजाबाद, कानपूर देहात आणि सीतापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, गाजीपूर, गोंडा, अमेठी, संत कबीर नगर आणि सिद्धार्थनगर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. बलिया, कन्नौज, बाराबंकी, जौनपूर आणि उन्नाव जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू वीज पडून झाला आहे, असं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत देण्याच निर्देश दिले असल्याची माहिती सांगितली जात आहे.