वास्को शहरातील एका शाळेत सात वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर, त्या मुलीच्या पालकांशी संवेदनशून्यतेने बोलणाऱ्या संबंधित शाळेच्या पदाधिकाऱ्याची, व्यवस्थापनाने चौकशी सुरू केली आहे.
मर्मागोवा पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पी. मारा पंडियान यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, व्यवस्थापन समितीतील एक सदस्य अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने आपल्याशी बोलले अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केली. त्याची तत्काळ दखल घेत आम्ही सदर पदाधिकाऱ्याविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘तुमची मुलगी जितका भासवते आहे तितका तिला त्रास झालेला नाही’, असे विधान संबंधित पदाधिकाऱ्याने केले होते. यामुळे उद्विग्न झालेल्या मुलीच्या पालकांनी संबंधित पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती.
१४ जानेवारी रोजी सात वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या शौचालयात बलात्कार करण्यात आला होता.व्यवस्थापनसमितीने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या नेतृत्वाखाली सदर चौकशी करण्यात येत असून आठवडाभरात समिती आपला अहवाल सादर करील. तसेच यापुढे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिसरात येत्या दोन दिवसांत ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहितीही पंडियान यांनी दिली.

Story img Loader