अमेरिकेत फेसबुक,  गुगल, स्काइप या बडय़ा इंटरनेट सेवा कंपन्यांच्या सव्‍‌र्हरमधील माहितीवर ओबामा प्रशासनाने डल्ला मारल्याची बातमी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘गार्डियन’ यांनी दिल्यानंतर झोपी गेलेले नेटीझन्स जागे झाले. एवढेच नव्हे तर फोन कॉल्सची माहितीही ओबामा प्रशासनाने घेतली आहे. तुम्ही काय बोलत होतात हे आम्हाला कळत नव्हते पण कुणाशी बोलत आहात एवढेच आम्ही बघितले, असा शहाजोग खुलासाही ओबामा यांनी केला आहे. हा माहितीवर दरोडा घालण्याचा प्रकार ‘प्रिझ्म’ या योजनेअंतर्गत फार पूर्वीपासून अमेरिकेत चालू आहे फक्त आता तो चारचौघात उघड झाला एवढेच. नाही म्हणायला ओबामा यांनी त्यांच्या पूर्वसुरींनी जे केले त्याच्या काही पावले पुढे टाकली आहेत हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच या प्रकाराने नेटीझन्सचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आरोप जागरूक अमेरिकी नेटकरांनी नेटाने केला आहे.

‘प्रिझ्म’चा इतिहास
प्रिझ्म हा माहिती चोरण्याचा पद्धतशीर कार्यक्रम २००७ मध्ये एनएसए व एफबीआय यांच्या सहकार्याने अमलात आला. अमेरिकेतून परदेशात किंवा परदेशातून अमेरिकेत संदेशांची काय देवाणघेवाण होते यावर पाळत ठेवणे हाच त्याचा प्रमुख हेतू होता. अमेरिकेच्या साधारण सात पैकी एका गुप्तचर अहवालात आपल्याला प्रिझ्ममधून मिळवलेली माहिती वापरलेली दिसते. त्यात मायक्रोसॉफ्ट, याहू, गुगल, फेसबुक, पालटॉक, एओएल, स्काइप, यूटय़ूब, अ‍ॅपल या सर्व कंपन्यांच्या सव्‍‌र्हरमधील माहिती घेण्याचे अधिकार राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला आहेत.

सर्व काही निगराणीखाली
ऑनलाइन तुम्ही जे काही करता ते सगळेच या निगराणीखाली येते असे म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा सरकार काहीच गैर करीत नाही कारण या कंपन्यांशी सरकारने तसे करार केलेले आहेत. प्रोटेक्ट अमेरिका कायदा २००७ अन्वये सध्या ओबामा प्रशासन जे करीत आहे ते वैध आहे. त्यानंतर २००८ मध्ये फिसा सुधारणा कायद्यामुळे अमेरिकी प्रशासनाला दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे आणखी अधिकार मिळाले.

नेमकी पद्धत काय?
यात वरील कंपन्यांना अ‍ॅटर्नी जनरल किंवा राष्ट्रीय गुप्तचर महासंचालक यांच्याकडून आदेश मिळतो, त्यानंतर सव्‍‌र्हर एफबीआयच्या ताब्यात दिले जातात व त्यांच्या माहिती संकलन तंत्रज्ञान विभागाकडून माहिती काढून घेऊन ती राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडे पोहोचवली जाते.

कुठली माहिती घेतली जाते?
* ऑडिओ-व्हिडिओ गप्पा
* छायाचित्रे
* इमेल
* डॉक्युमेंट,
* कनेक्शन लॉग्ज (स्काइप)
* मेटाडाटा- फोन कॉल कुणाला केले, तुम्हाला कुणी फोन केले याचे लॉग रजिस्टर

नवीन युक्त्या काय?
* अमेरिकेत निक्सन यांच्या काळापासून माहितीवर देखरेख ठेवण्याचे उद्योग सुरू आहेत, त्यानंतर टेडी केनेडी यांनी त्यात वायरटॅपिंगला सुरुवात केली.जॉर्ज बुश यांनी सध्या ओबामा वापरत आहेत ती सगळी यंत्रणा प्रत्यक्षात आणली. पण बराक ओबामा यांच्यावरचा राग त्यांनी आणखी डोकावण्यासाठी जे केले त्यामुळे आहे.
* सुरुवातीला ओबामा अशा टेहळणी विरोधात होते पण २००८ मध्ये त्यांनी फॉरेन इंटेलिजन्स सरव्हिलन्स अ‍ॅक्टला विरोध केला पण त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी नागरी स्वातंत्र्य वगैरे बासनात गुंडाळून माहितीची टेहळणी योग्य ठरवली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर नंतर त्यांच्या नागरी स्वातंत्र्याच्या पुळक्याचा बुरखा फाडला होता.
* ओबामा यांनी माहिती टेहळणीची व्याप्ती वाढवली, फोन कॉल्सची टेहळणी सुरू केली.दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी परदेशात जाणारे कॉल्स व परदेशातून येणारे कॉल्स यांच्यावर नजर ठेवण्याचे काम ओबामा प्रशासनाने सुरू केले. देशी कॉल्सवरही लक्ष.