गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदापाठोपाठ उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारीपद सोपवून राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींपुढे शरणागती पत्करल्याची भावना भाजपमध्ये आणि विशेषत: उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्यांमध्ये झाली आहे. मात्र, अमित शाह यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी करून आपण कोणताही गुन्हा केलेला नाही तसेच हा निर्णय कुणाच्याही दडपणाखाली घेतला नसल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेल्या अमित शाह यांना उत्तर प्रदेश भाजपचा प्रभार सोपविण्यासाठी राजनाथ सिंह यांच्यावर मोदींचा दबाव असल्याची चर्चा होती आणि शेवटी तसेच घडल्यामुळे राजनाथ सिंह यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजीचे सूर उमटण्याची चिन्हे आहेत. अमित शाह यांच्या नियुक्तीकडे उत्तर प्रदेशातील भाजप नेते कडवटपणे पाहात आहेत. राजनाथ सिंह यांनी आपल्याच राज्यात मोदींना निमंत्रण दिले आहे, अशी टीकाही या निर्णयावर होत आहे.
राजनाथ सिंह यांनी विविध राज्यांच्या प्रभारीपदांचे वाटप करताना मोदी आणि जेटली यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठरणाऱ्या बिहारचे प्रभारीपद राष्ट्रीय सरचिटणीस धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. प्रधान हे जेटली यांचे समर्थक मानले जातात. जेटलींचेच समर्थक जगत प्रकाश नड्डा यांना सत्ता असलेल्या छत्तीसगढची जबाबदारी देण्यात आली आहे. मोदींच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या पक्षाच्या उपाध्यक्ष स्मृती इराणी यांना भाजपची सत्ता असलेल्या गोव्याचा प्रभार देण्यात आला आहे. मध्य प्रदेशची जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांचे विश्वासू अनंतकुमार यांना देण्यात आली आहे, तर मोदींच्या पसंतीनुसार ओमप्रकाश माथुर गुजरातचा प्रभार सांभाळतील.
राजनाथ सिंह यांचे निकटस्थ मानले जाणारे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव प्रताप रुडी यांच्यावर महाराष्ट्रात भाजपमध्ये गडकरी-मुंडे वाद हाताळण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. रालोआचा घटक असलेल्या शिवसेनेला सांभाळून राज ठाकरे यांच्या मनसेशी युतीसाठी तडजोडींची कसरतही रुडी यांना करावी लागणार आहे. प्रथमच सरचिटणीस झालेले रुडी हे आव्हान पेलू शकतील काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरुण गांधी यांना पश्चिम बंगाल, मुरलीधर राव यांना तामिळनाडू, एस. एस. अहलुवालिया यांना आसाम आणि प्रभात झा यांना आंध्र प्रदेशचा प्रभार सोपविण्यात आल्याने भाजपसाठी राजकीयदृष्टय़ा दुष्काळी ठरलेल्या या राज्यांमध्ये त्यांच्या राजकीय अनुभवाची व कौशल्याची कसोटीच पाहण्याचे राजनाथ सिंह यांनी ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा