उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मतदारसंघात कडवी झुंज मिळणार आहे. आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढणार आहेत. गुरुवारी आझाद समाज पक्षाने अधिकृत घोषणा करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढतील अशी माहिती दिली.

या घोषणेनंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्वीट करत आभार मानले. गेल्या पाच वर्षांपासून लढत असून आताही लढणार असं ते म्हणाले आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे.

लोकसत्ता विश्लेषण: योगी आदित्यनाथ अयोध्येऐवजी गोरखपूरमधून का लढणार?

चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही परिवर्तनाची लढाई लढत असल्याचं ते म्हणाले आहेत. याआधी समाजवादी पक्षासोबत युती करण्यासंबंधी त्यांची चर्चा सुरु होता. मात्र ही चर्चा पूर्णत्वास जाऊ शकली नाही.

चंद्रशेखर आझाद यांनी देहरादूनमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. २०१५ मध्ये त्यानी भीम आर्मी भारत एकता मिशनची स्थापना केली, ज्याचे ते संस्थापक आहेत. मे २०१७ मध्ये शब्बीरपूर गावात जातीय हिंसाचार सुरू झाला तेव्हा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्यानंतर चर्चेत आले होते.

याआधी चंद्रशेखर आझाद यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर त्यांनी त्यावेळी पक्ष नसल्याने मायावती आणि काँग्रेस यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षाची स्थापन केल्यानंतर त्यांनी आपण योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढू असं सांगितलं होतं.

“उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून जाणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा विधानसभेत जाऊ नयेत हेदेखील महत्वाचं आहे. त्यामुळे ते जिथून लढतील तिथून मीदेखील लढणार,” असं ते म्हणाले होते.

Story img Loader