देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचं आव्हान निर्माण झालेलं असून, परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. विशेषतः उत्तर प्रदेशातील स्थिती गंभीर असून, गंगेत वाहून आलेल्या मृतदेहामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार टीकेचं धनी ठरलं. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात आलं. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती (स्ट्रॅटेर्जी) ठरवण्यासाठी रविवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि आरएसएस नेत्यांची उपस्थिती होती. ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडूनच नाही, तर भाजपातील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यातच अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपाने सरकारची प्रतिमा चांगली करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याचं काम सुरू केलं आहे.

याचं अनुषंगाने रविवारी भाजपा-आरएसएसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुनील बन्सल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थिती होते. उत्तर प्रदेशात २०२२मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या निर्माण झालेल्या करोना परिस्थितीचा निवडणुकीवर होणार परिणाम आणि त्यावर मात करून पक्षाला पुन्हा पहिल्या नंबरवर ठेवण्यासाठी आखायच्या रणनीतीवर आरएसएस आणि भाजपा नेत्यांची चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात महत्त्वाच्या पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपाला झटका बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने जोरदार टक्कर देत समान जागा मिळवल्या आहेत. तर मथूरा आणि इतर पंचायत समितीचे निकालही भाजपाला चिंतन करायला लावणारे आहेत. या निकालातून धडा घेत आणि सध्या कोविड हाताळणीवरून होत आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपाचे खासदार, मंत्री आणि नेतेच योगी सरकारवर टीका करताना दिसून आले, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Story img Loader