उत्तर प्रदेशातल्या एका भाजप नेत्यानं योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभाराला कंटाळून इस्लाम स्वीकारण्याची धमकी दिली आहे. योगी सरकार उत्तरप्रदेशात हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरली आहे असं या नेत्याने म्हटले आहे. पवन अग्रवाल असं या भाजप नेत्याचं नाव असून डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा उल्लेख केला आहे. पवन अग्रवाल हे उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादचे भाजपचे शहर संयोजक आहेत. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यावर हिंदूंवरच्या अत्याचारांना आळा बसेल असे वाटले होते, मात्र हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदूंना त्रास देणे, त्यांची हत्या होणे किंवा त्यांच्या घरी चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे नेतेही उत्तरप्रदेशात सुरक्षित नाहीत.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या प्राथमिकता बदलल्या आहेत. त्यांना हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांशी काहीही देणेघेणे नाही असेच दिसते आहे. पवन अग्रवाल हे आरटीआय कार्यकर्तेही आहेत. उत्तरप्रदेशात बसपा, सपा सरकार असताना घडलेली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली आहेत. काही दिवसांपूर्वी अग्रवाल यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यांची रिव्हॉल्वरही लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली तेव्हा तुम्ही तर उच्च जातीचे आहात, मागासवर्गीय हिंदू आणि मुस्लिम सुरक्षा ही आमची प्रमुख जबाबदारी आहे असे पोलिसांनी म्हटल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे. इतकंच नाही तर आपली खिल्ली उडवत आपल्याला परत पाठवून दिले असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
मी उच्च जातीत जन्माला आलो ही माझी चूक आहे का? असाही प्रश्न अग्रवाल यांनी विचारला आहे. तसेच आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कार्यालयाला ट्विटही केलं होतं. मात्र आपल्या कोणत्याही तक्रारीची दाद घेण्यात आली नाही असंही अग्रवाल यांनी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या सगळ्या वातावरणाला कंटाळून मला आता इस्लाम स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. निदान मी इस्लाम स्वीकारल्यावर तरी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाकडे योगी सरकारचे लक्ष जाईल असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे. तसंच धर्म बदलला तरीही भाजप सोडणार नाही, कारण मागच्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी एकनिष्ठतेने काम केले आहे ते यापुढेही करणार आहोत असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.