उत्तर प्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदार क्षेत्रातून भाजपाच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सावित्रीबाईंचा काँग्रेस प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, फुले यांच्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला दलित मतांचा मोठा आधार होता.
सावित्रीबाई फुले यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपला रामराम केला होता. परंतु त्यांनी त्यावेळी आपण कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केले नव्हते. खासदार सावित्रबाई फुले यांनी भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. यासह त्यांनी राम मंदिर आणि दलितांवरील हल्ल्यांवरुन भाजपला लक्ष्य केले होते. यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केला होता, आणि आयुष्यात कधीही भाजपासोबत जाणार नसल्याचेही जाहीर केले होते. याशिवाय समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत.