उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा भोंगळ कारभार एका धक्कादायक प्रकारामुळे उघडकीस आला आहे. आग्र्यातील एका विद्यालयाने दहावीच्या परिक्षेसाठी चक्क सचिन तेंडुलकरच्या मुलाचे छायाचित्र वापरून बनावट प्रवेश पत्र जारी केल्याचे प्रकरण गुरूवारी उघडकीस आले. आग्रा येथे आजपासून दहावीच्या परिक्षेची सुरूवात होत आहे. त्याच्या एक दिवस आधी हा प्रकार समोर आला.
अर्जुन सिंह या नावाने जारी करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे छायाचित्र चिटकविण्यात आले आहे. प्रवेश पत्रावर अर्जुनच्या वडिलांचे नाव रामनिवास असे नमूद करण्यात आले असून, आग्रा येथील अंकुर इंटर कॉलेजने हे प्रवेश पत्र जारी केले आहे.
दरम्यान, या बनावट प्रवेश पत्रावरून उत्तर प्रदेश बोर्डाचा भ्रष्टाचारी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, यासारखी शेकडो बनावट प्रवेश पत्रं यावेळी जारी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.