उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे डोकं चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या वडिलांनी मद्यपान करणे सोडावं, यासाठी मुलानं केस कापण्यास नकार दिला. जोपर्यंत वडिल मद्यपान सोडणार नाहीत, तोपर्यंत केस कापणार नाही, असा हट्ट मुलानं केला. त्यानंतर चिडलेल्या वडिलांनी परवानाधारक बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली. सदर व्यक्तीचे नाव शिव प्रकाश सिंह (वय ४५) असल्याचे सांगितले जाते. वाराणसीच्या मिर्झा मुराद परिसरात शिव प्रकाश सिंह यांचे घर आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले.
वाराणसीचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा शिव प्रकाश सिंह मद्याच्या अंमलाखाली नव्हता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. शिव प्रकाश यांचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे २००४ पासून शस्त्र परवाना आहे. शिव प्रकाश यांना शिवम (१५) आणि सुंदरम (१२) अशी दोन मुले आहेत. मुलाशी झालेल्या भांडणानंतर शिव प्रकाश यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी शिव प्रकाश यांनी यांनी आपल्या मुलांना केस कापून येण्यास सांगितले. दरम्यान मुलाने आपल्या मित्रांसमवेत होळी साजरी केली. जेव्हा मुलगा घरी परत आला तेव्हा त्याने केस कापले नसल्याचे वडिलांच्या लक्षात आले.
जेव्हा वडिलांनी याबाबत मुलाला जाब विचारला तेव्हा त्यांच्यात यावरून वादावादी झाली. वाद वाढल्यानंतर शिव प्रकाश यांनी स्वतःवर गोळी झाडली. यानंतर कुटुंबियांनी लागलीच शिवप्रकाश यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही लागलीच रुग्णालयात जाऊन कुटुंबियांचा जबाब नोंदविला.