काँग्रेसचे लोक हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात यापेक्षा दुर्दैवी प्रकार कोणता? असा प्रश्न विचारत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांची एक रॅली हुबळीमध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
कर्नाटक विधानसभेसाठी पुढील वर्षी निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही रॅली आयोजित करण्यात आली होती. कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहते. त्यांच्या हत्याही होत आहेत. यामुळे कर्नाटकातील अराजकता समोर आली आहे. अशात इथले मुख्यमंत्री मारूतीरायाची पूजा करण्याऐवजी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात धन्यता मानतात, ही बाब निश्चितच दुर्दैवी असल्याचे आदित्यनाथ यांनी म्हटले.
कर्नाटक ही हनुमानाची भूमी मानली जाते. तसेच याच राज्यातील विजयनगर साम्राज्यामुळे देशाचे कौतुक झाले होते. मात्र, आपल्या समृद्ध परंपरा सोयीस्करपणे विसरून हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रकार कर्नाटकात सुरु आहे. १८ व्या शतकात टिपू सुलतानचे राज्य होते. त्याची जयंती साजरी करण्याचे नेमके औचित्यच हिंदू धर्म आणि संस्कृतीचा अपमान करण्यासारखे असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने टिपू सुलतानची जयंती साजरी केली. ज्या कार्यक्रमाला भाजपने कडाडून विरोध केला. या जयंतीवरून मोठा वादही निर्माण झाला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी तर टिपू सुलतान हा बलात्कारी शासक होता, अशी टीकाही केली होती. ज्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. आता योगी आदित्यनाथ यांनीही हाच मुद्दा पुढे करत काँग्रेसवर टीकेचे ताशेरे ओढले.
कर्नाटकमधून काँग्रेस सरकार उलथवून टाका, हिमाचलमध्ये काँग्रेसला जसे हाकलले तसेच इथून हाकला असेही आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. जर कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आली तर या राज्यात पुन्हा कधीही टिपू सुलतानची पूजा होणार नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.