गोरखपूर येथील हॉटेल कृष्णा पॅलेसवर सोमवारी रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांनी मारहाण केल्याने एकाच मृत्यू झाला. दरम्यान, या धक्कादायक घटनेप्रकरणी बुधवारी पहाटे तीन ज्ञात पोलिसांविरोधात आणि तीन अज्ञात पोलिसांविरोधात खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. या छाप्यात ३८ वर्षीय प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ताची हत्या झाली होती. या छाप्यात सामील असलेल्या या सर्व पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मनीष गुप्ता हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘चाहते’ होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीसी कलम ३०२ (खून) अंतर्गत गोरखपूरच्या रामगढताल पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुप्ताच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रामगढतालचे एसएचओ जगत नारायण सिंह आणि उपनिरीक्षक अक्षय मिश्रा आणि विजय यादव याशिवाय आणखी तीन अज्ञात पोलिसांची नावं (निलंबित)ह्यात आहेत. बुधवारी मध्यरात्री केलेल्या ट्विटमध्ये यूपी पोलिसांनी म्हटलं की, जे घडलं ते ‘दुर्दैवी’ होतं. आता संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजी/ डीआयजी/ एसएसपी गोरखपूर यांना चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.”

योगी आदित्यनाथ यांचे ‘चाहते’

मनीष गुप्ता हे योगी आदित्यनाथ यांचे ‘चाहते’ होते. जे गोरखपूरला आपल्या आवडत्या नेत्याने केलेली विकासकामं पाहण्यासाठी गेले होते. मात्र, आपल्या ओळखीचा पुरावा सादर करण्यासाठी जास्त वेळ लागल्याने पोलिसांनी मनीष गुप्ता यांना मारहाण केली. ज्यात गुप्ता यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या पूर्वनियोजित कानपूर दौऱ्यादरम्यान गुरुवारी (३० सप्टेंबर) गुप्ता कुटुंबाला भेटतील.”

पोलिसांच्या हल्ल्यात मुत्यू – पत्नीचा आरोप

कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनीष गुप्ता यांच्या मीनाक्षी म्हणाल्या की, पोलिसांना वाचवण्यासाठीची त्यांची नावे एफआयआरमध्ये लिहिली गेली नाहीत. मीनाक्षी यांनी असाही आरोप केला आहे की, पोलिसांनी मनीष गुप्ता यांच्याशी गैरवर्तन केलं आणि जेव्हा त्यांनी याबाबत आक्षेप घेतला तेव्हा त्याच्यावर हल्ला केला. परिणामी ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला”.

निष्पक्ष चौकशीचं आश्वासन देऊन तक्रार न करण्याची विनंती

मनीष गुप्ताच्या कुटुंबीयांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये असं देखील दिसून आलं आहे की, गोरखपूरचे एसपी विपिन टाडा आणि जिल्हा दंडाधिकारी विजय किरण आनंद हे कुटुंबियांना ‘निष्पक्ष चौकशीचं आश्वासन देऊन” तक्रार न करण्याची विनंती करत आहेत.

मनीष गुप्ता यांच्या पत्नीच्या सहा मागण्या

  • ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी
  • सरकारी नोकरी द्यावी
  • प्रकरण कानपूरनगरला हस्तांतरित करावं
  • हत्येची सीबीआय चौकशी व्हावी
  • ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्या हॉटेलवर कारवाई व्हावी
  • दोषी पोलीस आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी

अंत्यसंस्कार करण्यास दिला होता नकार

कानपूरच्या बुरा भागात राहणाऱ्या या कुटुंबाने आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मनीष गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पहिल्यांदा डीसीपी आणि इतर अधिकाऱ्यांनी मनीषच्या पत्नी मीनाक्षी आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावल्यानंतर ते अंतिम संस्कारांसाठी तयार झाले होते. मात्र, इतर नातेवाईक आणि नेत्यांनी याला विरोध केला. तेव्हा थोडा गोंधळ झाला. यानंतर, मीनाक्षी यांना आपला निर्णय बदलावा लागला. मीनाक्षी म्हणाल्या होत्या की, मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही पार्थिवावर अंतिम संस्कार करू देणार नाही.

गुरुवारी (३० सप्टेंबर) सकाळी अखेर मृत्यूनंतर तब्बल ५३ तासांनी मनीष गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बुधवारी (२९ सप्टेंबर) रात्री उशिरा कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मीनाक्षी गुप्ता यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर असीम म्हणाले, गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुप्ता कुटुंबियांना भेटण्यासाठी येतील. या आश्वासनानंतर पीडितांचे कुटुंब मनीषच्या अंतिम संस्कारांसाठी तयार झालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm yogi adityanath fan manish gupta killed by police gst