Yogi Adityanath On Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. दहशतवादी हल्ल्याचा संपू्ण देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा इशारा दिला आहे. ‘भारत किसी को छेडता नहीं, लेकिन कोई छेड़ेगा तो उसको छोडेगा भी नहीं’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसेच हा नवीन भारत असून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना गुन्हेगारांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

“पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपल्या समाजात दहशतवाद किंवा अराजकतेला स्थान नाही. भारत सरकारची सुरक्षा आणि सेवा आणि सुशासनाचे मॉडेल विकासावर आधारित आहे. ते गरिबांच्या कल्याणावर आणि सर्वांच्या संरक्षणावर आधारित आहे. मात्र, जर कोणी सुरक्षेचं उल्लंघन करण्याचं धाडस केलं तर हा नवा भारत आहे. त्याला समजेल अशाच भाषेत योग्य उत्तर देण्यास तयार आहे”, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

“ये नया भारत किसी को छेडता नहीं लेकिन अगर कोई छेडेगा तो उसको छोडेगा भी नहीं”, असं योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील रॅलीला संबोधित करताना म्हटलं आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांपैकी एकाच्या कुटुंबाची भेट घेत शोक व्यक्त केला. तसेच भारत सरकार अशा भ्याड कृत्यांना खपवून घेणार नाही, सरकार योग्य ती कारवाई करेल, असंही त्यांनी म्हटलं.