Yogi Adityanath On Mandir-Masjid Debate : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला वारसा परत घेण्यात काहीही गैर नाही असे विधान केले आहे. प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी मंदिर-मशीद वादावर भाष्य केले आहे.
“आपला वारसा परत घेणं वाईट गोष्ट नाही. संभलमध्ये सनातनचे पुरावे दिसत आहेत. त्यामुळे वादग्रस्त वास्तूंना मशीद म्हटले जाऊ नये. भारत मुस्लिम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही”, शाही जामा मशीद वादाचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचाराची घटना घडली होती.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद वादाबद्दल चिंता व्यक्त केली होती, तसेच लोकांना अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले आहे.
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा न्यायालयाच्या आदेशानंतर संभलमध्ये हिंसाचार झाला होता. यावर बोलताना आदित्यनाथ यांनी पुराणात भगवान विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्कीचे जन्मस्थान म्हणून संभलचा उल्लेख असल्याचे सांगितले. संभाल येथे झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता तर २० हून अधिक जण जखमी झाले होते.
“१५५६ मध्ये संभालमधील हरिहर मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि एक वास्तू उभी करण्यात आली. याचा उल्लेख आईना-ए-अकबरीमध्येही आहे”, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
या प्रकरणात याचिकाकर्त्याने दावा केला आहे की ‘बाबरनामा’ आणि ‘आईना-ए-अकबरी’मध्ये सांगण्यात आले आहे की जामा मशीद ज्या ठिकाणी उभी आहे तेथे हरिहर मंदीर होते. आईना-ए-अकबरी हा अकबराच्या राजवटीतील मुघल साम्राज्यातील प्रशासनासंबंधी एक दस्तऐवज आहे. अकबराच्या दरबारात असणारे इतिहासकार अबुल फझल यांनी ते लिहिले होते.
योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीच्या स्वच्छेतेच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षावर देखील टीका केली. त्यांनी दावा केली की मॉरिशसच्या पंतप्रधानांनी २०१३ मध्ये कुंभ मेळ्याला भेट दिली होती. पण तेव्हा तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी पवित्र गंगेत स्नान करण्याचे टाळले होते.