UP CM Yogi Adityanath On Mathura Row : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील मशिदीवरून चालू असलेल्या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे. आदित्यनाथ म्हणाले, “ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही न्यायालयाच्या आदेशांचं पालन करत आहोत. अन्यथा तिथे खूप काही घडलं असतं. आमचं सरकार कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक गोष्ट करतंय.” यावेळी त्यांनी म्हटलं की “मुस्लीम समुदाय उत्तर प्रदेशमध्ये सर्वात सुरक्षित आहे.”
योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या राज्यात मुसलमान सुरक्षित आहेत का? त्यावर योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित आहेत. आमच्या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत तर मुसलमान देखील सुरक्षित आहेत.” यावेळी त्यांना ‘बुलडोझर जस्टीस’बाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “जो व्यक्ती जसा व ज्या भाषेत समजून घेईल त्याला त्या भाषेत समजावलं जाईल.”
अखिलेश यादव यांच्या टीकेला उत्तर
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की राज्यातील डबल इंजिन सरकार डगमगतंय. दोन्ही इंजिन एकमेकांना नमस्कार देखील करत नाहीत. त्यावर विद्यमान मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही आमच्या नेतृत्वाचा सन्मान करतो. आम्ही आमच्या पूर्वजांचा आदर राखतो. परंतु, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे त्यांचं आचरण तसंच असेल.”
समाजवादी पार्टीवर टीका
औरंगजेब हा समाजवादी पार्टीचा आदर्श असल्याची टिप्पणी करत योगी आदित्यनाथ म्हणाले, “महाराणा प्रताप, महाराणा सांगा, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह यांच्याबद्दल हे लोक (सपा) आम्हाला शिकवणार का? यांना इतिहासाची किती जाण आहे? हे सपावाले लोक औरंगजेब आणि बाबरची पूजा करतात, मोहम्मद अली जिन्नाह यांना आदर्श मानतात.”
‘वक्फ’ वादावरही प्रतिक्रिया
वक्फ बोर्ड आणि जमिनींवरून चालू असलेल्या वादावरही योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “वक्फच्या नावाखाली कधी कल्याणकारी कामे केली आहेत का? तुम्ही त्यांचं एकही काम सांगू शकत नाही. वक्फ ज्या जमिनीकडे बोट दाखवून म्हणेल की ही आमची जमीन आहे ती त्यांना द्यायची? आपण त्यांच्या गोष्टी मान्य करायच्या? गेल्या कित्येक वर्षांपासून तेच घडतंय. आम्ही हे सगळं पाहून हैरान आहोत. हा कुठला आदेश आहे. जेपीसीने वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत काही शिफारसी केल्या आहेत आणि ही आजची सर्वात मोठी गरज आहे. सर्वांनी त्यावर विचार करणं आवश्यक आहे. या देशात मुस्लिमांच्या हितांचं रक्षण केलं जाईल आणि ते इथे सुरक्षित आहेत.”