उत्तर प्रदेशमध्ये सध्या विविध प्रकल्प उभारण्याची लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित बुधवारी (६ ऑक्टोबर) चंदौली जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली. मात्र, या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ योगी आदित्यनाथ यांना काहीसा अडचणीत आणणारा आहे. ह्या व्हिडिओत योगींच्या संबंधित कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, आम्ही या कार्यक्रमात पैशांसाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे मिळालेच नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पत्रकारांनी कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या गर्दीतील एका व्यक्तीला प्रश्न विचारला की, “तुम्ही योगी आदित्यनाथांना ऐकायला आला होतात का?” त्यावर एका व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्हाला या जाहीर सभेत बोलावलं होतं. जबरदस्ती बोलावलं गेलं होतं.” त्यानंतर पत्रकाराने विचारले की, “तुम्ही कोणाच्या बाजूने आला होता” तर समोरील व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्ही रेशन विभागाच्यावतीने आलो आहोत.”

“आम्हाला काहीही दिलं गेलं नाही”

पत्रकाराने विचारलं की, तुम्ही इथे फक्त जबरदस्तीने आला होतात का? यामागे कोणतंही कारण नव्हतं का? त्यावर दुसऱ्या एका व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्ही इथे पैसे घेण्यासाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे दिले गेले नाहीत.” त्यावर पत्रकाराने पुन्हा विचारलं की, “तुम्हाला इथे येण्यासाठी काही पैसे मिळाले का?” या प्रश्नाला उत्तर देताना समोरील म्हणून म्हणाला की, “काहीही दिलं गेलं नाही.” दरम्यान, जेव्हा या पत्रकाराने एका महिलेला तिचं कार्यक्रमाला येण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की, “मला माहित नाही. फक्त फोन करून बोलावून घेतलं.”

चंदौलीसाठी ८०० कोटी प्रकल्पांची भेट

चंदौलीमधील या कार्यक्रमात बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली. यावेळी, त्यांनी सांगितलं की, आज आपण सर्वांनी चंदौलीसाठी ८०० कोटी प्रकल्पांची भेट आणली आहे.

Story img Loader