Yogi Adityanath on Mahakumbh 2025 Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्याला आज गालबोट लागले. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले असून अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी वा मृतांची संख्या अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नसली तरीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत भाविक गंभीर जखमी झाले असल्याचं म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थिती पूर्वपदावर आणण्याकरता आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली.
“संगम घाटातील घटनेनंतर घटनेची माहिती घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चारवेळा फोन केला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही संपर्क साधला आहे. तसंच, राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. तसंच, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता उच्चस्तरीय बैठकही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकाही सामील आहेत, अशीही माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
सभी पूज्य संतों, श्रद्धालुओं, प्रदेश एवं देश वासियों से मेरी अपील है कि अफवाह पर कोई ध्यान न दें, संयम से काम लें, प्रशासन आप सभी की सेवा के लिए तत्परता से कार्य कर रहा है… pic.twitter.com/r3qAkveJoz
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 29, 2025
आधी भाविकांना प्राधान्य
“प्रयागराजमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, पण गर्दी वाढली आहे. आखाडा परिषदेतील लोकांशी चर्चा केली. त्यांनी सुरुवातीला भाविकांना स्नान करण्याची परवानगी दिली असून भाविकांची गर्दी ओसरल्यावर साधू, संत स्नान करणार आहेत. काल (२८ जानेवारी ) साडेपाच कोटी भविकांनी महाकुंभ येथे स्नान केले. तर आज सकाळपासून तीन कोटी लोकांनी स्नान केलं. पण संगम नोज आणि आखाडा मार्गावर सातत्याने गर्दी वाढत जातेय. भाविकांच्या सुविधेकरता प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका, संयमाने वागा, हे आयोजन सर्वांचं आहे”, असं आवानही योगी आदित्यनाथ यांनी केलंय.
गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी घाटापर्यंत येण्याची आवश्यकता नाही. वृद्ध, लहान बालके आणि आजारी लोकांनी जवळच्या घाटावर जाऊन स्नान करावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.