Yogi Adityanath on Namaz: ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या मेरठनंतर इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे आदेश पारित करण्यात आले. यासंदर्भात वाद-प्रतिवाद चालू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आदेशांचं समर्थन केलं आहे. ‘रस्ते चालण्यासाठी असतात’, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंकडून शिस्त शिकण्याचा सल्ला दिला आहे.

योगी आदित्यनाथ यांची पीटीआय वृत्तसंस्थेनं सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात मेरठमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. मेरठमध्ये रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच, अशी स्थिती दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता. यावर काही आक्षेप घेण्यात आल्याबाबत विचारणा केली असता त्यावर योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ यांनी मेरठ प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचं समर्थन केलं. “मेरठमध्ये जे आदेश निघाले ते बरोबरच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात. जे लोक हे बोलत आहेत, त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी ६६ कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, हल्ले, छेडछाड, तोडफोड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही आहे धार्मिक शिस्त. श्रद्धेनं आले, महास्नान केलं आणि आपापल्या घरी परतले”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“असे उत्सव बेशिस्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन बनता कामा नयेत. तुम्हाला सुविधा हवी असेल तर शिस्त पाळावी लागेल. तुम्ही या सगळ्याची तुलना करताय कावड यात्रेशी. कावड यात्रा हरिद्वारपासून गाझियाबादपर्यंत जाते. त्यामुळे ते रस्त्यावरूनच चालणार. आम्ही कधी मुस्लीम समुदायाची मिरवणूक अडवली आहे का? मुहर्रमचीही मिरवणूक निघते. आम्ही हे सांगितलं की ताजियाची उंची कमी करा. पण ते तुमच्या सुरक्षेसाठी. वर विजेच्या तारा असतात. त्यामुळे उंची कमी करा असं सांगतो. विजेच्या तारांचा धक्का बसला तर जिवावर बेतू शकतं”, असं योगी आदित्यनाथ यांनी नमूद केलं.

“नमाज पढण्याची जागा इदगाह किंवा मशीद आहे”

“कावड यात्रेतही आम्ही सांगितलं की डीजेची उंची कमी करा. जे करत नाहीत त्यांच्यावर आम्ही सक्ती करतो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो. ईदच्या दिवशी तुम्ही तासनतास नमाज पढण्याच्या नावाखाली रस्ता रोखून ठेवणार का? नमाज पढण्यासाठीची जागा इदगाह किंवा मशीद असू शकते. रस्ता नाही”, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.