उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम प्रवाशांना नमाज पठणासाठी दोन मिनीट बस थांबवल्यामुळे एका बस वाहकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी समोर आला होता. दोन दिवसांपूर्वी या बसवाहकाने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली असून आता उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळावर या वाहकाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. नोकरीवरून काढण्यात आल्यामुळे मानसिक तणाव येऊनच त्यांनी आत्महत्या केल्याची व्यथा पत्नीनं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केली आहे.
काय घडलं नेमकं?
३२ वर्षीय मोहित यादव उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होते. ३ जून रोजी कौशंबीवरून दिल्लीच्या दिशेने जाणारी बस त्यांनी रामपूरनजीक दोन मिनिटांसाठी थांबवली होती. बसमधील काही मुस्लीम प्रवाशांना नमाज पठनासाठी त्यांनी बसचालक के. पी. सिंह याला दोन मिनिटांसाठी बस थांबवायला सांगितली. मात्र, हे प्रकरण त्यांना फारच महागात पडलं. याविरोधात काही लोकांनी तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहित यादव यांना नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ३ जून रोजी हा सगळा प्रकार घडल्यापासून मोहित यादव बेरोजगार होते. २७ ऑगस्ट रोजी ते घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यता आली. मात्र, २८ ऑगस्ट रोजी रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पत्नीनं मांडली व्यथा
दरम्यान, आपल्या पतीचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर त्यांची पत्नी रिंकी यादव यांनी आपली व्यथा मांडली आहे. “त्यांची नोकरी गेल्यापासून माझे पती तणावात होते. घरखर्च भागवण्यासाठी पैसेच शिल्लक राहिले नव्हते. घरातल्या सर्व लोकांच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. जून महिन्यापासून त्यांचा १७ हजार रुपये पगार बंद झाला होता. त्यामुळे लहान-सहान गोष्टींसाठीही आम्हाला संघर्ष करावा लागत होता. त्यांना रात्री झोपही लागत नव्हती, त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी त्यांच्या माणुसकीची किंमत चुकवली आहे”, असं त्या म्हणाल्या.
दहावीच्या विद्यार्थिनीनं अकराव्या मजल्यावरून मारली उडी, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
“उत्तर प्रदेश परिवहन मंडळाचे अधिकारी दीपक चौधरी त्यांना फोन कॉल करून मानसिक त्रास देत असत. त्यांचा अपमान करत असत. तेच माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार आहेत”, असा आरोप रिंकी यादव यांनी केला आहे.
मोहीत यांचा व्हिडीओ
दरम्यान, मोहित यादव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. “मी बस थांबवली कारण मला वाटलं फक्त दोन मिनिटांचा प्रश्न आहे. त्याचवेळी इतर काही प्रवासीही खाली उतरले होते. तेव्हा कुणीही तक्रार केली नव्हती”, असं मोहित यादव म्हणाले होते. त्यामुळे आता हे प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.