काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहचली आहे. ८ दिवसांच्या कालावधीसाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. राहुल गांधी हे योगी सारखं तपस्या करत आहे, असेही सलमान खुर्शीद यांनी म्हटलं. सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथे सलमान खुर्शीद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कडाक्याच्या थंडीत यात्रेमध्ये चालताना राहुल गांधी टी-शर्टचा वापर करतात. यावर खुर्शीद म्हणाले, “आपल्याला जॅकेट घालूनही थंडी वाजत आहे. पण, राहुल गांधी टी-शर्टमध्ये यात्रा करत आहे. मला वाटत राहुल गांधी सुपरमॅन आहेत.”
“प्रभू श्री राम यांची खडाऊ ( पादत्राणे ) खूप लांबपर्यंत जात असे. कधी कधी भरत पादत्राणे घेऊन रामजी पोहचत नसलेल्या ठिकाणी जात असे. भरत यांच्याप्रमाणे आम्ही उत्तरप्रदेशमध्ये पादत्राणे पोहचवले आहेत. आता रामजी ( राहुल गांधी ) सुद्धा येतील,” असं खुर्शीद यांनी सांगितलं.
हेही वाचा : भाजप-काँग्रेसमधील ‘माफी’वाद तीव्र
हेही वाचा : इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवून न्यूनगंड निर्मिती – मोदी
चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी यात्रा स्थगित करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहलं होतं. यावरूनही खुर्शीद यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. “देशात कोणतेही नियम लागू करण्यात आले, तर आमच्यासाठीही ते लागू असतील. पण, करोना म्हणत नाही की मी फक्त काँग्रेससाठी येणार आहे. भाजपासाठी येणार नाही. नियम लागू करण्यात आले, तर त्याचं आम्ही पालन करु,” असे खुर्शीद यांनी स्पष्ट केलं.