उत्तर प्रदेशमधील लखनौ न्यायालयाने शाही इदगाह मशिदीबाबतची एक याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेत शाही इदगाह मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. आधी लखनौ न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी मथुरा न्यायालयात याला आव्हान दिलं. यावेळी मथुरा न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यासारखी असल्याचं म्हटलं. यानंतर लखनौ न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली.
याचिकाकर्त्यांनी शाही इदगाह मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधली असल्याचा दावा केलाय. तसेच ही मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधली असल्याने ती हटवावी, अशी मागणी करण्यात आलीय. मथुरा न्यायालयाने या प्रकरणाची पुराव्यांच्या आधारे सुनावणी घेण्यास सांगितले आहे. मथुरा न्यायालयाने या प्रकरणी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद प्रकरणाचा निकाल १९ मेपर्यंत राखीव ठेवला होता.
लखनौच्या रहिवासी रंजना अग्निहोत्री यांच्यासह इतर सहा जणांनी या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आलीय. या प्रकरणी एकूण ३ याचिका दाखल आहेत. त्यापैकी दुसरी याचिका हिंदू आर्मी प्रमुख मनिष यादव आणि तिसरी याचिका इतर ५ जणांनी वकील महेंद्र प्रताप सिंह यांच्या माध्यमातून दाखल केलीय.
या याचिकांमध्ये मुघल राजा औरंगजेबाच्या आदेशाने १६६९ ते १६७० दरम्यान ही मशीद बांधल्याचं म्हटलंय. तसेच ही १३.३७ एकर जमीन कत्र केशव देव मंदिराच्या मालकीची असल्याचं सांगितलं.