उत्तर प्रदेशमधील मेरठमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे. मेरठमधील करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ९४१ वर पोहचली आहे. त्यामुळेच येथील सर्वात मोठं सरकारी करोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत. या केंद्रामधील पंखे काम करत नाहीयत, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचं चित्र दिसत आहे.

दिल्लीमधील विद्यापिठामध्ये शिकणाऱ्या वशिष्ट शर्मा नावाच्या तरुण मुलाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रामध्ये दाखल असणाऱ्या त्याच्या वडिलांसाठी कुटुंबियांनी स्वत: फोल्ड होणारी खाट केंद्रांत आणली. वॉर्डातील कॉरीडोअरमध्ये ठेवण्यात आलेल्या खाटेवर या मुलाचे वडील उपचार घेत आहेत. “आम्ही आमची खाट आणली हे एका अर्थाने चांगलं आहे. येथील परिस्थिती इतकी वाईट आहे की रुग्ण चादरी टाकून किंवा थेट जमीनीवरच झोपून उपचार घेत आहेत,” असं शर्मा सांगतो. “माझ्या वडीलांना २८ एप्रिल रोजी येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाचा त्रास असला तरी छातीसंदर्भातील इतर त्रासही त्यांना जाणवत आहे. येथे रुग्णसंख्या अधिक असल्याने डॉक्टर माझ्या वडिलांसाठी वेळ देत नाहीत,” असं शर्मा याने सांगितलं.

नक्की वाचा >> “सर्वांनी सकाळी दहा वाजता यज्ञ केल्यास देशात करोनाची तिसरी लाट येणार नाही”; भाजपाच्या महिला मंत्र्याचा दावा

मेरठमधील या कोवीड सेंटरमध्ये सरकारी बेड्सच्या मधल्या जागेमध्ये लोकांनी स्वत: आणलेल्या खाटा ठेवलेल्या आहेत. या केंद्रात करोना नियमांचं पालन होतानाही दिसत नाही. रुग्णांच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक बसून असतात. रुग्णांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने नातेवाईकांना परवानगी देण्यात आल्याचं समजतं. या ठिकाणी मोकळी हवाही नाहीय. येथील एक ३४ वर्षीय रुग्ण चक्क एक्स रे रिपोर्टच्या सहाय्याने स्वत:ला हवा घालतानाही दिसला.

“या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. येथे डॉक्टर्सही पुरश्याप्रमाणात नाहीत. एकदा माझ्या आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा मीच तिला मदत केली. तिला चांगल्या पद्धतीने श्वास घेता येईल यासाठी मीच बेडवर तिची जागा बदलली. नर्स येण्याची वाट मी पाहत बसलो नाही,” असं एक ३१ वर्षीय व्यक्ती त्याच्या ५५ वर्षीय आईसंदर्भात बोलताना सांगत होता. या ठिकाणी ३७० ऑक्सिजन बेड्स आहेत तर १४० आयसीयू बेड्स आहेत. यापैकी एकही बेड सध्या रिकामा नाहीय. मागील २४ तासांमध्ये मेरठमध्ये १५ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ६०१ वर पोहचलाय. जिल्ह्यामध्ये रोज १५०० नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत. लखनौनंतर मेरठमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

जिल्ह्यात एकूण २ हजार ९७४ बेड्स असून यापैकी १ हजार ६७२ ऑक्सिजन तर ५८३ आयसीयू बेड्स आहेत. बहुतांश बेड्स हे भरलेले आहेत. जिल्ह्यात १७२ व्हेंटिलेटर बेड्स अशून त्यापैकी ९२ बेड्स मंगळवारपर्यंत भरलेले होते. या केंद्रातील प्रमुख असणाऱ्या डॉ. ज्ञानेंद्र कुमार यांनी करोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचं सांगितलं आहे. “आमच्या २०० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आम्ही सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या येथील ६० जणांना करोनाची लागण झाल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढलाय,” असं कुमार सांगतात.

मेरठचे मुख्य आरोग्य अधिकारी अखिलेश मोहन यांनी जिल्ह्यातील परिस्थिती सुधरत असल्याचा दावा केलाय. “सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांसंदर्भात आम्हाला काही ट्रेण्ड दिसून येत आहेत. काही जुन्या प्रकरणांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या अधिक दिसत असेल. मात्र पुढील आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी होण्याची अपेक्षा आम्हाला आहे,” असं मोहन म्हणाले.

Story img Loader