उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून, राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजपाने स्थानिक परिस्थितीचा आदमास घेण्यास सुरूवात केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. योगीच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा भाजपात होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असं ओवेसी म्हणाले असून, योगी आदित्यनाथांनी ओवेसींचं आव्हान स्वीकारलं आहे. एका कार्यक्रमात योगींनी यावर भूमिका मांडली. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना योगींनी उत्तर दिलं आहे.
बिहारमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर एमआयएम इतर राज्यांमध्येही विस्तार करताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही एमआयएम मैदानात उतरणार आहे. यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल विधानं केलं होतं. ‘योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही,’ असं ओवेसी म्हणाले होते. ओवेसींनी दिलेल्या आव्हानाला योगींनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा- राज्यावलोकन : योगींचे आव्हान कायम?
ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार बनणार. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजपा आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो,” असा पलटवार योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींवर केला.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम शंभर जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियाही एमआयएमने सुरू केली आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून माहिती दिली होती. “उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीबद्दल काही मुद्दे मांडत आहे. शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली आहे. आमची आघाडीसंदर्भात कोणत्याही पक्षांशी चर्चा झालेली नाही,’ असंही ओवेसी यांनी स्पष्ट केलं होतं.