उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये काही प्रवासी खासदारांच्या बनावट शिफारस पत्राचा तिकीट कन्फर्म करण्यासाठी वापर करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींची नावे सय्यद हुसैन आणि पंकज कुशावहा अशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडे याबद्दल तक्रारी येत होत्या. त्याच्या चौकशीनंतर हे प्रकरण समोर आलं आहे.

उत्तर रेल्वेला अशी माहिती मिळाली की, काही जण बेकायदेशीररित्या आजी-माजी खासदारांच्या बनावट लेटर पॅडचा वापर करुन व्हिआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करुन घेत आहेत. ह्या तक्रारींनंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा- उत्तरप्रदेश : अन् अवघ्या काही तासातच अरूण सिंह यांची उमेदवारी भाजपाने केली रद्द!

रेल्वेकडून हेही सांगण्यात आलं की लेटरहेडवरच्या नंबरला फोन केला तर कोणीच उचलायचं नाही. म्हणूनच रेल्वे प्रशासनाने अशा तिकीटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली. तेव्हा IRCTC एजंट सय्यद हुसैन सापडला. तो स्वतःच्या तसंच IRCTCच्या प्रोफाईलवरुनही तिकीटं बुक करायचा. तपासानंतर लक्षात आलं की त्याने आत्तापर्यंत अशा प्रकारे ५१ तिकीटं तयार केली आहेत.

आणखी वाचा- २३८ वातानुकूलित लोकलचा निर्णय अधांतरी

सय्यदने सांगितलं की, अशा प्रकारे तिकीटं बुक केल्यानंतर तो आपला साथी पंकज कुशावहाकडे ही तिकीटे द्यायचा. त्यानंतर पंकज व्हिआयपी कोट्यातून ही तिकीटे कन्फर्म करायचा. यासाठी तो प्रतिव्यक्ती ५०० रुपये शुल्कही वसूल करायचा. या माहितीच्या आधारावर पंकज कुशावहालाही ताब्यात घेण्यात आलं.

त्यावेळी त्याच्याकडे वेगवेगळ्या नेत्यांचे १३ लेटर पॅड सापडले. या लेटरपॅडवर लिहिण्यासाठी तो आपल्या अल्पवयीन मुलीची मदतही घ्यायचा. त्यानंतर रेल्वे कार्यालयातल्या व्हिआयपी कोट्यासाठीच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर रेल्वे कायद्यातल्या कलम १४३ आणि १४३ ब अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

Story img Loader