Gau Rakshak killed Biryani seller in Agra : आग्रा शहरातील एका स्वयंघोषित गोरक्षकाने बुधवारी (२३ एप्रिल) ताजगंज भागात एका बिर्याणी विक्रेत्याची गोळी झाडून घालून हत्या केली आहे. हा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला होता असं त्याने हत्येनंतर म्हटलं होतं. रविवारी आग्रा पोलिसांनी या गोरक्षकाच्या मुसक्या आवळल्या. मनोज चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने गुलफाम अली (२७) याची हत्या केली आहे. गुलफामच्या मागे त्याची पत्नी फिजा (२३) आणि तीन मुलं असा परिवार आहे.

आग्रा पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की “अटक केलेल्या संशयिताने हत्येनंतर एक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये त्याने मनोज चौधरी असं त्याचं नाव सांगितलं होतं. तो स्वयंघोषित गोरक्षक आहे. तसेच तो क्षत्रिय गोरक्षक दलाचा सदस्य देखील आहे. हत्येच्या घटनेनंतर त्याला पकडण्यासाठी आम्ही राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये छापेमारी केली. त्याला मध्य प्रदेशमध्ये बेड्या ठोकल्या आणि आता आग्र्याला आणलं आहे.”

मनोजच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध

गुलफाम अली हा त्याच्या चुलत भावाच्या मालकीच्या शाहीद अली चिकन बिर्याणी या रेस्तराँमध्ये काम करत होता. २३ एप्रिलच्या रात्री तो रेस्तराँ बंद करत असतानाच तीन जण एका स्कूटरवरून तिथे आले. त्यापैकी दोघेजण गुलफामशी बोलत होते, त्याचवेळी त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याने गुलफामच्या छातीत गोळी झाडली. रेस्तराँमधील सैफ अली हा तरुण मदतीसाठी धावला. त्याचवेळी या तिघांनी त्याला ढकललं आणि ते तिघे स्कूटरवरून पळून गेले. या हत्येतील मनोजच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

व्हिडीओ शेअर करून हत्येची जबाबदारी स्वीकारली

या हत्येच्या काही तासांनी मनोज चौधरीने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्याने कमरेला पिस्तुल अडकवल्याचं दिसत होतं. या व्हिडीओमधून त्याने गुलफाम अलीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यात त्याने दावा केला होता की “हा पहलगाममधील २६ जणांच्या हत्येचा बदला होता. २६०० जणांना मारून हा बदला पूर्ण केला जाईल.”

पोलिसांना वाटलेलं की हा पब्लिसिटी स्टन्ट असावा

पोलिसांनी आधी या व्हिडीओमधील संदर्भ, व गोरक्षक दलाचा संबंध नाकारला होता. त्यांनी म्हटलं होतं की हा कदाचित एखादा पब्लिसिटी स्टन्ट असावा. तसेच पोलीस आयुक्त दीपक कुमार म्हणाले होते की “काही दिवसांपूर्वी बिर्याणी विक्रेत्याने विकलेल्या बिर्याणीच्या गुणवत्तेवरून झालेल्या भांडणातून ही हत्या केली असावी.”