भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या कृतीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या एकता दिनानिमित्त एकतेची शपथ घेण्यासाठी राम नाईक यांनी राष्ट्रगीताचे वादन थांबवल्याचा प्रकार घडला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी हा प्रकार घडला. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राजभवनात राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह सर्व जण राष्ट्रगीतासाठी जागेवर उठून उभे राहिले होते. त्यावेळी राजभवनातील बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविण्यासही सुरूवात केली. मात्र, त्याचवेळी राम नाईक यांना एकतेची शपथ घेण्याची आठवण झाली आणि त्यांनी हाताने बँड पथकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, राष्ट्रगीत सुरू झाले असल्याने बँड पथकाने न थांबता पूर्ण धून वाजवली. यादरम्यान, राम नाईक सातत्याने वेगवेगळे हावभाव करून बँड पथकाला थांबण्याचा इशारा करत होते. त्यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राष्ट्रगीत सुरू झाल्याची गोष्ट राम नाईक यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यांनी सांगितल्यानंतर राम नाईक जागेवर शांतपणे उभे राहिले खरे, परंतु, तोपर्यंत राष्ट्रगीत समाप्त झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा