उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. हाथरस येथील रतिभानपूर गावात ही घटना घडली. या गावात आज (मंगळवार, २ जुलै) साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साकार विश्व हरी यांचे हजारो अनुयायी उपस्थित होते. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगी देखील दिली होती. दरम्यान, सत्संग सुरू असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. ज्यामध्ये १०० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात करण्यात आली होती. मात्र ही चेंगराचेंगरी आणि मृतदेहांचा खच पाहून क्यूआरटी पथकातील पोलीस शिपाई रवी यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव मृतदेहांची व्यवस्था करत असताना एकाच वेळी त्यांनी इतके मृतदेह पाहिल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की “शिपाई रवी यादव हाथरसमधील चेंगरांचेगरीच्या घटनेनंतर मृतदेहांची व्यवस्था करत होते. ड्युटीवर असतानाच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.”

या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांची संख्यादेखील मोठी आहे. हाथरसमधील शासकीय रुग्णालयात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना दाखल करण्यात आलं असून रुग्णालयाची रुग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना या दुर्घटनेतील रुग्णांना दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य चालू आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे

आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी नुकतीच हाथरस येथे झालेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. या घटनेतील पीडितांना शक्य ती सर्व प्रकारची मदत केली जात आहे. या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.

हे ही वाचा >> उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश

या घटनेच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय या घटनेतील मृतकांच्या कुटुबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.