Crime News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये झालेल्या हत्याकांडांची चर्चा देशभरात झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता पुन्हा एखादा असाच प्रकार समोर आला आहे. यूपीच्या देवरिया येथे एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या करून मृतदेहाचे दोन तुकडे ट्रॉली बॅगमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव नौशाद अहमद (३८) असे असून तो अवघ्या १० दिवसांपूर्वी दुबईहून परतला होता. अहमद याचा तुकडे केलेल्या अवस्थेतील मृतदेह अहमद याच्या घरापासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तारकुलवा पोलिस स्टेशन परिसरातील एका शेतात रविवारी सकाळी एका शेतकऱ्याला आढळला.

जितेंद्र गिरी नावाच्या शेतकऱ्याला हा मृतदेह सापडला, चाकरपकडी चापर पटखौली गावातील त्यांच्या शेतात हार्वेस्टर घेऊन आल्यानंतर त्यांना एका रिकाम्या जागेत एक संशयास्पद ट्रॉली बॅग पडलेली दिसली तेव्हा त्यांनी ताबडतोब ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली

जेव्हा तारकुलवा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी परिसराची कसून तपासणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी जसे की एएसपी अरविंद वर्मा आणि सीओ सिटी संजय रेड्डी हे देखील श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

नेमकं काय झालं?

“जेव्हा बॅग उघडली तेव्हा पोलिसांना प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेला पुरुषाचा धड आढळून आले. शरीराचा खालचा अर्धा भाग एका पोत्यात भरलेला होता. एक परदेशी सिम कार्ड, फोटोकॉपी केलेली कागदपत्रे आणि विमानतळ टॅग असलेला ट्रॅव्हल बारकोड यामुळे मृताची ओळख नौशाद अहमद अशी पटवण्यात मदत झाली” असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरविंद वर्मा यांनी सांगितले.

पुढील चौकशीसाठी पोलीस नौशाद याच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना आणखी एक रक्ताचे डाग असलेली सूटकेस सापडली. आरोपींनी सुरूवातीला दुसऱ्या बॅगेत मृतदेह भरण्याचा प्रयत्न केल होता, पण ते शक्य न झाल्याने त्यांनी ट्रॉली बॅग वापरण्याचा निर्णय घेतला. यानंतर नौशाद याची पत्नी रझिया हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्या केल्याचे कबूल केले, तिने प्रियकराबरोबर मिळून – जो नात्याने तिचा भाचा लागतो – त्यांच्यान नौशादची हत्या केली, कारण तो त्यांच्या अवैध संबंधात अडथळा बनत होता , असे एसीपी वर्मा म्हणाले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपी दोघांचे अवैध संबंध हे त्यांच्या गावात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होते.

जवळपास एक वर्षापूर्वी नौशाद याने या दोघांना गावच्या पंचायतीमध्ये यावरून जाब विचारला होता. यावेळी रझिया तिच्या प्रियकराशी संबंध तोडेल असा निर्णय घेण्यात आला. मात्र नौशाद दुबईला परतल्यानंतर त्यांच्यातील संबंध पुन्हा सुरू झाले.

एएसपी अरविंद वर्मा यांनी सांगितले की नौशादची हत्या ही त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे झाली. “आरोपी महिलेने कबूल केले आहे आणि तिच्या फरार प्रियकराला अटक करण्यासाठी जिल्हा एसओजीसह अनेक पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत,” असे वर्मा म्हणाले. फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिस आता फरार असलेल्या प्रियकराचा शोध घेत आहेत.