Dawood Ibrahim News उत्तर प्रदेशातल्या हेमंत जैन यांनी मुंबईतल्या नागपाडा या भागात दाऊद इब्राहिमच्या नावे असलेलं १४४ स्क्वेअर फुटांचं दुकान विकत घेतलं आहे. दरम्यान या दुकानाचा ताबा मिळवण्यासाठी त्यांना एक दोन नाही तब्बल २३ वर्षे लागली आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?
मुंबईतल्या नागपाडा भागात असलेल्या जयराजभाई मार्गावर १४४ स्क्वेअर फुटांचं दुकान आहे. हे दुकान अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावे होतं. हे दुकान उत्तर प्रदेशातील हेमंत जैन यांनी २००१ मध्ये खरेदी केलं होतं. यावर मालकी मिळवण्यासाठी त्यांना २३ वर्षांचा लढा द्यावा लागला. हेमंत जैन यांनी हे दुकान प्राप्तीकर विभागाने जो लिलाव केला त्या लिलावात २० सप्टेंबर २००१ या दिवशी खरेदी केलं होतं. मात्र त्यांना मागची २३ वर्षे या दुकानाचा ताबाच मिळाला नाही. विभागीय प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनांनी घातलेला खोडा यामुळे २३ वर्षे ते मालमत्तेवर हक्क सांगू शकले नाहीत. ही मालमत्ता २००१ मध्ये त्यांनी लिलावात विकत घेतली होती. ती नावावर होण्यासाठी त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.
हे पण वाचा- नवाब मलिकांचा मुलगा फराझही अडचणीत; दाऊद इब्राहिम आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीचं समन्स
हेमंत जैन यांनी कसा लढा दिला?
लिलावात हे दुकान विकत घेतल्यानंतर हेमंत जैन यांना ताबा मिळाला नाही. २०१७ पर्यंत त्यांनी विविध कार्यालयांना तसंच पंतप्रधान कार्यालयांनाही यासंबंधीचं पत्र लिहिलं. २०१७ मध्ये या मालमत्तेच्या संबंधीची फाईल नोंदणी कार्यालयातून हरवली. ज्यानंतर हेमंत जैन यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हेमंत जैन यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आणि त्यांचे मोठे भाऊ पियूष जैन यांच्या तसंच काही खासदारांच्या मदतीने अखेर हा प्रश्न मार्गी लावला. ज्यानंतर १९ डिसेंबर २०२४ या दिवशी ही मालमत्ता आणि त्याची नोंदणी हेमंत जैन यांच्या नावे करण्यात यावी असा निर्णय न्यायालयाने दिला. दरम्यान या दुकानावर दाऊदच्या हस्तकांचाच ताबा आहे अशीही माहिती समोर येते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
मालमत्ता विकत घेऊन नावावर करण्यासाठी २३ वर्षांची लढाई
मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहीम याची मालमत्ता लिलावात खरेदी करणारे हेमंत जैन यांना २३ वर्षांच्या लढाईनंतर मालकी हक्क मिळाला आहे. त्यामुळे हेमंत जैन यांच्या नावाची सोशल मीडियावरही चर्चा होते आहे.हेमंत जैन यांनी १४४ चौरस फुटांचं हे दुकान २ लाख रुपयांना खरेदी केलं होतं. कारण लिलावात त्यांनीच सर्वात जास्त बोली लावली होती. मात्र नंतर यातल्या प्रशासकीय अडचणी वाढत गेल्या आणि मग मला न्यायालयात जावं लागलं आणि हक्क मिळवण्यासाठी दाद मागावी लागली असंही हेमंत जैन यांनी पत्रकारांना सांगितलं.
© IE Online Media Services (P) Ltd