उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. अंजनी कुमार साहू नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला मारण्याची सुपारी दिली होती. मात्र मारेकऱ्याने अंजनी कुमारच्या मुलाचा खून केला. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी चार आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून हत्यार जप्त केली. अंजनी कुमार यांनी तक्रार दिल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमले होते. या विशेष पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. तसेच सीसीटीव्ही आणि मोबाइल टॉवर लोकेशन सारखे तंत्रज्ञान वापरून आरोपींचा छडा लावला. शिवम रावत (२०), आशिष कुमार (२१), आमिर आलम (२२) आणि शिवा रावत (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रक्ताने माखलेला चाकूही जप्त केला.

पोलीस उपायुक्त सिंह यांनी सांगितले की, विनायक साहू आणि त्याचे वडील अंजनी कुमार साहू यांनी आई शांती साहू आणि तिचा प्रियकर इम्रानला मारण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली. इम्रानबरोबर राहण्यासाठी शांती साहूने अंजनी कुमार यांना सोडले होते. या अवमानाचा सूड घेण्यासाठी बाप-लेकांनी मिळून आई आणि तिच्या प्रियकराला धडा शिकविण्याची योजना आखली.

विनायक साहूने हत्या करण्यासाठी आमिर आणि आशिषला ऑटोरिक्षा देण्याचे आणि शिवम आणि शिवाला अडीच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ५ मार्च रोजी मारेकऱ्यांनी विनायक साहूकडे आगाऊ १.५ लाख रुपये मागितले. मात्र हत्या होण्याआधीच पैसे देण्यास विनायकने नकार दिला. यावेली त्यांच्यात बाचाबाची झाली. ज्यामध्ये विनायकने चौघांनाही मारण्याची धमकी दिली. यामुळे मद्याच्या अंमलाखाली असलेल्या आरोपींनी विनायकच्या गळ्यावर चाकूचा वार केला. ज्यामध्ये विनायक जागीच ठार झाला.

पोलीस उपायुक्तांनी पुढे म्हटले की, जिथे खून झाला, तिथून बिअरचे दोन मोकळे कॅन, रक्ताने माखलेला चाकू, चपलेचे दोन जोड, दोन मोबाइल फोन आणि रक्ताचे डाग असलेला गमछा सापडला आहे. सापडलेल्या वस्तूंवर आरोपी आणि पीडितांचे ठसेही सापडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.