UP Crime News: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी झाल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने माहेरी आलेल्या प्रेयसीची चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत प्रियकराचाही मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. या प्रकरणातील पीडित प्रेयसी २३ वर्षांची होती, तर आरोपी २७ वर्षांचा होता.

या प्रकरणातील मृत आरोपी राहुल याचे २३ वर्षीय तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. पण, ती दुसऱ्या धर्माची असल्याने त्यांच्या या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. प्रेयसीचे लग्न दुसऱ्या कोणाशीतरी झाल्याचे समजल्यानंतर आरोपी राहुल अस्वस्थ होता. दरम्यान प्रेयसी नुकतीच माहेरी आली होती. हे समजल्यानंतर राहुलने गच्चीवर चढून प्रेयसीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर चाकूने वार केला. यावेळी पीडीतेने आरडाओरड केल्यानंतर तिच्या घरचे धावले आणि त्यांनी आरोपीला काठ्यांनी मारहाण केली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे पीडितेलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तिचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी फरार

या प्रकरणी राहुलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून, मृत प्रेयसीची आई, बहीण आणि काका यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटनेच्या वेळी प्रेयसीचे वडील आणि भाऊ कामासाठी मुंबईला गेले होते. तत्पूर्वी मृत प्रेयसीच्या कुटुंबीयांनीही तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे राहुलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बांदा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला असला तरी, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच आरोपी अस्वस्थ

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, राहुल आणि मृत प्रेयसीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, राहुल कामासाठी मुंबई आणि गोव्याला गेला होता आणि नुकताच तो गावी परतला होता. यावेळी त्याला प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजल्याने तो अस्वस्थ झाला आणि तिची हत्या केली.

दरम्यान, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader