Ban Namaz on Road in UP: रस्त्यावर नमाज पढण्याचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते असा दावा केला जातो. याच पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्च रोजी ईदच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील मीरत पोलिसांनी इशारा दिला आहे. रस्त्यावर नमाज पढल्यास थेट पासपोर्ट रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, असं मीरत पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कारवाईवर केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय लोकदलचे प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी सूचक पोस्ट शेअर केली आहे.
काय आहेत मीरत पोलिसांचे आदेश?
मीरत पोलिसांनी ईदच्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढले आहेत. मुस्लीम समाजाने या काळात रस्त्यावर नमाज पढण्यासाठी बसू नये, असं आवाहन मीरत पोलिसांकडून करण्यात आलं आहे. ईदच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश न पाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणे, पासपोर्ट व वाहन परवाने रद्द होणे अशी कारवाई होऊ शकते, असा इशाराच मीरत पोलिसांनी दिला आहे.
मीरत पोलिसांनी बुधवारी जिल्हाधिकारी विजय कुमार सिंह यांच्याकडे आठ जणांची यादी सादर केली असून त्यांच्याकडून गेल्या वर्षी रस्त्यावर नमाज न पढण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. या सर्वांचे परवाने व पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
“कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही”
“आम्ही लोकांना आवाहन केलं आहे की त्यांनी नजीकच्या मशीद किंवा इदगाह येथे नमाज पढण्यासाठी जावे. आम्ही सक्त ताकीद दिली आहे की कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर नमाज पढण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही”, अशी माहिती मीरतचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी दिली आहे. गेल्या वर्षी या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही गुन्हे दाखल केले असून यावेळीही जर कुणी रस्त्यावर बसलं, तर कठोर कारवाई केली जाईल, असंही सिंह म्हणाले.

संभल, अलिगढ, हथरस, गाझियाबाद या ठिकाणीदेखील मीरतप्रमाणेच रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी केली आदेशाची ‘ऑरवेल’च्या पोलिसांशी तुलना!
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह चौधरी यांनी या आदेशांची तुलना थेट जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘१९८४’ या कादंबरीतील ‘थॉट पोलिसां’शी केली आहे. या कादंबरीत थॉट पोलीस सत्ताधाऱ्यांविरोधात विचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करताना दाखवण्यात आले आहेत.