UP Minister Sanjay Nishad Viral Video : उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मंत्री संजय निषाद यांनी वादग्रस्त विधान केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान निषाद यांचे हे वादग्रस्त विधान ऐकून सभेला हजर असलेले लोक मात्र टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
एका सभेत व्यासपीठावरून बोलताना मंत्री निषाद म्हणाताना ऐकू येत आहे की, ‘मी येथे असाच पोहचलो नाही. सात इन्स्पेक्टरांचे हात-पाय मोडून त्यांना खड्ड्यात फेकल्यानंतर इथपर्यंत पोहचलो आहे.’ सभेच्या व्यासपीठावर हातात माइक घेऊन बोलणाऱ्या मंत्र्यांनी हे विधान ऐकल्यानंतर समोर बसलेले लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
नेमकं झालं काय होतं?
१४ मार्च रोजी होळीच्या निमीत्ताने सुल्तानपूर येथील शाहपूर गावात रंग खेळण्यावरून दलित आणि निषाद कुटुंबात वाद झाला होता. या वादानंतर मारहाणीत ६५ वर्षीय दलित महिला सुनरा देवी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीत शाहपूर गावाचे सरपंच कृष्णा कुमार निषाद यांच्यासह पाच जणांविरोधात खटला दाखल केला. गावच्या सपंचासह ४ लोकांना पोलीसांनी तुरूंगात टाकले.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या संजय निषाद यांना जेव्हा या सर्व प्रकरणाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी व्यासपीठावरून सीओ यांना आदेश दिले की जे लोक या प्रकरणात खोट्या पद्धतीने फसवण्यात आले आहेत त्यांची नावे काढून टाकावित. तसेच त्यांनी याबद्दल डीएम आणि एसपी यांच्याशी चर्चा केली असून आता ते मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही निषाद भावाला पोलीस त्रास देणार नाहीत. जर कोणी पोलीस अधिकारी निषाद भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करेल तर त्याला तुरूंगात पाठवेन असेही निषाद यावेळी म्हणाले.
संजय निषाद मंगळवारी उत्तर प्रदेश येथील सुल्तानपूर येथे निषाद पार्टीच्या जनाधिकार यात्रेसाठी आले होते. त्यांनी येथे चांदा भागातील मदारडीह येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले.