उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यात सदर विधानसभेच्या बंडखोर काँग्रेस आमदार अदिती सिंह यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीय. आता एका मुलाखतीत त्यांनी प्रियंका गांधी महिलांसाठी पुढाकार घेत असतानाही त्यांनी काँग्रेस का सोडला? या प्रश्नाचं उत्तर दिलंय. या उत्तरात त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
“काँग्रेसचं हे महिला धोरण राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाबमध्ये का नाही?”
प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीत महिलांना घेऊन पुढे जात आहेत असं असताना एक युवा महिला नेत्या असूनही तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला असा प्रश्न अदिती सिंह यांना विचारण्यात आला. यावर अदिती सिंह म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष या मुद्द्यांवर गंभीर होता तर त्यांनी राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये हे मुद्दे लागू का केले नाही? मला त्यांच्याकडून १ टक्के देखील अपेक्षा नाही. या सर्व आश्वासनांमधून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची ‘नैया’ पार करू शकतील असं वाटत नाही.”
“काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचणं कठीण”
काँग्रेस पक्षात तुमचं ऐकून घेण्यात आलं नाही का? असा प्रश्न विचारला असता अदिती सिंह म्हणाल्या, “काही पातळ्यांवर ऐकून घेतलं आणि त्यावर कृती काहीच केली नाही, तर त्याचा उपयोग काय. काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचणं कठीण आहे. मी रायबरेली मतदारसंघातून होते म्हणून माझी तरी भेट व्हायची. मात्र, असे अनेक नेते होते ज्यांची यांच्यासोबत भेटच होत नसे.”
हेही वाचा : “भाजपा मतं मागायला आल्यावर…”, लखनौमध्ये तरुणांवरील लाठीचार्जवर राहुल गांधींचा हल्लाबोल
“माझं ऐकून घेतलं जायचं मात्र त्यावर कोणतीही कृती केली जायची नाही. माझे प्रियंका गांधींसोबत व्यक्तिगत मतभेद नव्हते, जे मतभेद होते ते राजकीय होते. मी अनेकदा त्यांच्यापर्यंत माझे मुद्दे पोहचवले, मात्र त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही,” असा आरोप अदिती सिंह यांनी केला. प्रियंका गांधी यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जनतेपासून अगदी वेगळं केलं आहे, असाही आरोप अदिती सिंह यांनी केला.