उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील ज्या शाळेत शिक्षिकेने इतर मुलांकरवी एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, ती शाळा बंद करण्यात आली आहे. तसंच, हा मुलगा आता तणावात असून तो अस्वस्थ असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. त्याला रात्री व्यवस्थित झोपही लागली नसल्याचं वडिलांनी सांगितलं. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुलगा तणावात असल्याचे जाणवल्यावर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर तो सुस्थितीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पत्रकारांसह अनेकजण त्याला घडलेल्या घटनेबाबत सतत विचारत आहेत, त्यामुळे तो तणावात आहे”, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणात शिक्षिका त्रिप्ता त्यागी हिच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु, या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> “तडजोड करा, अन्यथा…”, मुस्लीम विद्यार्थ्याच्या वडिलांवर राजकीय दबाव वाढला; राकेश टिकैतांचाही हस्तक्षेप

शाळेला टाळे

या विद्यार्थ्यांबाबत जातीय शेरेबाजी केल्याचा आणि इतर विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप असलेली तृप्ता त्यागी या शिक्षिकेच्या मालकीची मुझफ्फरनगरमधील ही खासगी शाळा सध्या बंद करण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी शुभम शुक्ला यांनी रविवारी सांगितले. नेहा पब्लिक स्कूलने शिक्षण खात्याच्या निकषांची पूर्तता केली नसल्याने मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. शाळेतील सर्व ५० विद्यार्थ्यांना एका आठवड्यात सरकारी शाळेत किंवा इतर शाळांमध्ये सामावून घेतले जाईल.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावं. शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या तोंडावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असं काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुलं उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.

शिक्षिकेने काय म्हटलं?

“संबंधित विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती. त्या मुलाच्या काकानेच मला असं करण्यास सांगितलं होतं. मी ‘अपंग’ असल्याने मी इतर विद्यार्थ्यांना मारण्यास सांगितलं”, असं स्पष्टीकरण आरोपी शिक्षिकेनं दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up muslim boy slapped by classmates on teachers order cant sleep family sgk
Show comments