Asad Ahmed Encounter : कुख्यात गुंड, बाहुबली अतीक अहमदचा मुलगा असद अहमद गुरुवारी (१३ एप्रिल) पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. त्याच्यासोबत शूटर गुलामसुद्धा ठार झाला आहे. या एन्काऊंटरची कालपासून देशभर चर्चा आहे. काहीजणांनी उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांचं कौतुक केलं आहे, तर काहींनी या एन्काऊंटरप्रकरणी टीका केली आहे. परंतु, हे एन्काऊंटर नियोजित नसून आत्मरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं, पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवलं आहे. तसंच, या दोघांनी पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला असल्याचंही या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. काल नेमकं काय घडलं याचा थरारक अनुभव पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे.
असद आणि गुलाम एन्काऊंटरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये एन्काऊंटरवेळी घडलेली घटना आणि आरोपींचा मूळ हेतू नमूद करण्यात आलाय. पोलीस आणि आरोपींमध्ये जोरदार गोळीबार झाला. पोलिसांनी त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, असं एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा एन्काउंटरमध्ये ठार, उमेश पाल हत्याकांडानंतर ४९ दिवसांनी एसटीएफला यश
एफआयआरमध्ये काय लिहिलं आहे?
‘उमेश पालच्या हत्येनंतर आरोपी गुड्डू मुस्लिम झाशी येथे गेला होता. तो झाशीमध्ये सतीश पांडेच्या घरी राहत होता. १३ एप्रिल रोजी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असद आणि गुलाम झाशीमध्येच होते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात वेढा घातला. यावेळी दोघेजण दुचाकीने चिरगावच्या दिशेने जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जवळपास दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याने दोघेजण बिथरले. या नादात त्यांची दुचाकी पुढे जाऊन उलटली. त्यामुळे ते झाडीत जाऊन पडले. झाडीत पडल्यानंतर या दोघांनीही पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर आणि आत्मरक्षासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गोळीबाराचा आवाज येत असल्याच्या दिशेने पावलं टाकली. यावेळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. पण थोड्यावेळाने दुसऱ्या बाजूकडून सर्व शांत झालं. त्यामुळे पोलिसांनी पलिकडे जाऊन पाहिलं तेव्हा दोघेही जखमी अवस्थेत पडले होते,’ असं पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवलं आहे.
पोलिसांना त्यांना जिवंत पकडायचं होतं. परंतु, त्यांनी गोळीबार सुरू केल्याने आत्मरक्षणासाठी पोलिसांनाही प्रत्युत्तर द्यावं लागलं. या प्रयत्नात ते दोघेही जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघांना वेगवेगळ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशीही माहिती पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवली आहे. बंदूक, बंदूकीच्या गोळ्या, जिवंत काडतुसे, दुचाकी आणि इतर अनेक पुरावे पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहेत.
हेही वाचा >> मग न्यायालये कशासाठी? असदच्या एन्काऊंटरप्रकरणी ओवैसी सरकारवर संतापले, म्हणाले धर्माच्या नावाखाली…
नेमकं प्रकरण काय?
बसपाचे दिवंगत नेते राजू पाल यांच्या हत्येप्रकरणात उमेश पाल साक्षीदार होता. त्यामुळे उमेश पालचीही हत्या करण्यात आली. असद आणि गुलाम या दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. उमेश पाल हत्याप्रकरणी एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होतं. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठार केलं. एसटीएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) अनंत देव तिवारी म्हणाले, ‘आमच्या पथकाने असद आणि मकसूदला ठार केलं आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि परदेशी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.