Cousin Couple Commit Suicide in UP: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका जोडप्यानं मंगळवारी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता पती व पत्नी एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण असल्याचं समोर आलं. या नात्याला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. तेव्हापासून दोघे गाझियाबादमध्ये वास्तव्यास होते. मात्र, कुटुंबीयांकडून सातत्याने धमक्या मिळत असल्याने दोघांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही उत्तर प्रदेशच्या फार्रुखाबादचे रहिवासी होते. १७ फेब्रुवारी रोजी या दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीशिवाय पळून जाऊन विवाह केला. “आपले कुटुंबीय नात्याला मान्यता देणार नाहीत, म्हणून या दोघांनी आत्महत्या केली”, अशी माहिती कविनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी योगेंद्र मलिक यांनी दिली.
तीन पानांची सुसाईड नोट
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी मिळून लिहिलेली एक तीन पानांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांच्या भीतीने आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, स्वसंमतीने आम्ही हा विवाह करत असल्याचंही या नोटमध्ये नमूद केलं आहे. विवाहापासून हे दोघे गाझियाबादमधील शास्त्री नगर परिसरात वास्तव्यास होते, अशी माहिती कविनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंग यांनी दिली.
मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास पोलिसांना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी फोन करून आत्महत्येची माहिती दिली. दोघे घरात असताना दरवाजा बंदच असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिलं असता दोघांचे मृतदेह त्यांना आढळले. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी लागलीच दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. विवाह झाल्यापासून हे दोघे शास्त्रीनगर भागात भाड्यानं घर घेऊन राहात होते. यातील पती मजुरीचं काम करून घर चालवत होता.
उत्तर प्रदेशात ऑनर किलिंगचा प्रकार
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या जौनमना गावातील एक दाम्पत्य ऑनर किलिंगचं बळी ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार २१ वर्षीय पती व १८ वर्षीय पत्नी या दोघांचे रविवारी सकाळी राहत्या घरात मृतदेह आढळून आले. पोलिसांनी पतीच्या वडीलांच्या तक्रारीच्या आधारावर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात पत्नीच्या भावाचाही समावेश आहे.