देशाला हादरवणाऱ्या लखीमपूर हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तपासाला सुरुवात केलीय. आज या प्रकरणात पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. यानुसार उत्तर प्रदेश पोलीस केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या आरोपी मुलाला घेऊन थेट लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनास्थळी पोहचले. आता येथे त्या दिवशीची संपूर्ण घटना जशीच्या तशी उभी केली जाणार आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आशीष मिश्रा आणि सह आरोपी अंकित दास यांना लखीमपूरमधील घटनास्थळावर आणलं. तसेच पोलीस गाडीचा उपयोग करून त्या दिवशी नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज येण्यासाठी ती घटना जशीच्या तशी उभी केली जात आहे. पत्रकारांनी या घटना उभी करण्याच्या घटनेचा व्हिडीओ शूट केलाय. यात स्पष्टपणे दिसत आहे की घटनास्थळावर आंदोलक शेतकऱ्यांच्या जागेवर काही पुतळे (डमी) उभे केलेत. त्यानंतर पोलीस गाडी वेगाने येते आणि त्यांना धक्का देते आहे.

घटनास्थळ पोलिसांकडून सील

अन्य एका व्हिडीओत पोलिसांनी ज्या ठिकाणी लखीमपूर हिंसाचार घडला तो परिसर सील केल्याचंही दिसत आहे. मात्र, यावर टीकाही होत आहे. घटना घडल्यानंतर ४८ तासात हा परिसर सील करणं अपेक्षित होतं. मात्र, तेव्हा पोलिसांनी तसं केलं नाही. त्या ठिकाणी माध्यमांसह सर्व लोक वावरले. आता इतक्या उशिरा पोलीस हा भाग सील का करत आहे? असा सवाल विचारला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारल्यानंतर कारवाई दाखवण्यासाठी हे केलं जात असल्याचीही टीका केली जातेय.

नेमकं काय घडले?

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना मागून येऊन गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या लखीमपूरमधील या घटनेत ४ शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. महिंद्रा थार गाडीसह एकूण ३ गाड्यांच्या ताफ्यानं शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित शेतकरी संतापले. त्यांनी ज्या गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंत्री अजय मिश्रा यांच्या महिंद्रा थार गाडीचा चालक आणि २ भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader