भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर येथे आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याचे तीव्र पडसाद काश्मीर खोऱ्यात उमटले असून, या विद्यार्थ्यांवरील आरोप मागे घेण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत या विद्यार्थ्यांना अधिक कठोर शिक्षा ठोठावली असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असून, ते या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे ओमर यांनी सांगितले.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या ‘आशिया कप’ स्पर्धेमध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर मीरतमधील ‘स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठा’च्या ६० काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपापल्या खोलीतून बाहेर येऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद!’ अशा स्वरूपाच्या घोषाण दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे विद्यापीठ परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांवर तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली. मात्र काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. ‘‘या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, त्यात विद्यार्थी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’’ असे मीरतचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ओंकार सिंग यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलपती पी. के. गर्ग यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारावरच हे गुन्हे नोंदवण्यात आल्याचे ते म्हणाले. द्रेशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाल्यास या विद्यार्थ्यांना किमान तीन वर्षांची आणि कमाल जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
मीरतच्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश दिले, तर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शिस्तपालन समिती नेमली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंझूर अहमद यांची भेट घेतली असून, पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे वर्तन राष्ट्रविरोधी असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या विद्यापीठात विविध शाखेत २०० काश्मिरी विद्यार्थी शिकत आहेत.
काश्मीर खोऱ्यात तीव्र पडसाद
काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने त्याचे तीव्र पडसाद काश्मीर खोऱ्यात उमटले. या विद्यार्थ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि विद्यापीठ प्रशसनाने राष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’ने केली आहे. सत्ताधारी ‘नॅशनल कॉन्फरन्स’नेही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे.

पाकिस्तानचेही नक्राश्रू !
काश्मिरी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर पाकिस्ताननेही मतप्रदर्शन केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचा हा निर्णय दु:खद आणि दुर्दैवी आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मतप्रदर्शन करण्यास वा भावना व्यक्त करण्यास विद्यार्थ्यांना मोकळीक असावी, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्या तस्निम अस्लाम यांनी सांगितले. हे काश्मिरी विद्यार्थी जर पाकिस्तानात शिक्षण घेत असते, तर आम्ही त्यांना तेवढी मोकळीक दिली असती, असे सांगण्यासही अस्लाम विसरल्या नाहीत.

काश्मिरी विद्यार्थ्यांवर प्रमाणापेक्षा कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अस्वीकृत असून, या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असून, कारवाई मागे घेण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. यादव स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहेत, असे आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे.
ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, काश्मीर.

Story img Loader