Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रासाठी देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होणार आहेत. तसंच, हजारो अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशातील नागरिकांची आणि विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरता योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याबरोबरच उद्घाटन समारंभाच्या दिवशी राज्यभरात मद्यविक्री होणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी इमारती सजवा

आदित्यनाथ यांनी २२ जानेवारी रोजी सर्व सरकारी इमारतींना सजवण्याचे आणि कार्यक्रम साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्याचे आवाहन केले आहे. सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत स्वच्छतेचे ‘कुंभ मॉडेल’ राबविण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा >> अयोध्येत काहीतरी वेगळंच घडतंय! २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा यासाठी गर्भवती मातांचे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अर्ज!

स्वच्छता मोहिम राबवणार

अभिषेक सोहळ्याच्या तयारीदरम्यान स्वच्छ आणि सुंदर शहर राखण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी १४ जानेवारी रोजी अयोध्येत स्वच्छता मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना असेही सांगितले की, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रांतीची ठिकाणे अगोदरच ठरवावीत, जेणेकरून समारंभ सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल.

सात हजारांहून अधिक प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण

अयोध्या २२ जानेवारी रोजी मंदिरातील प्राण प्रतिष्ठेसाठी सजली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर विशेष निमंत्रित या महाकार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सात हजारांहून अधिक लोक मंदिर ट्रस्ट, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निमंत्रित यादीत आहेत. यामध्ये राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती आणि बऱ्याच लोकांचा समावेश आहे.

२२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा यासाठी गर्भवती मातांचे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अर्ज!

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील प्रसूती रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येनं दाम्पत्यांचे अर्ज येऊ लागले आहेत. ज्या महिलांची प्रसूती तारीख २२ जानेवारीच्या जवळपास आहे, अशा महिलांनी २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी विनंती करणारे अर्ज करायला सुरुवात केली आहे. रामलल्लांच्या आगमनाबरोबरच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, अशी इच्छा या दाम्पत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यासही ही दाम्पत्य तयार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात इंडिया टुडेनं कानपूर सरकारी रुग्णालयातील विभागप्रमुखांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up schools colleges closed on jan 22 liquor shops shut for ram temple opening sgk
Show comments