करोनाने देशात हाहाकार केला आहे. दरम्यान करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका मंत्र्याने ‘भीष्म प्रतिज्ञा’ घेतल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत देशात करोना साथीचा त्रास संपत नाही, तोपर्यंत ते अन्न घेणार नाहीत. तसेच गेल्या ५ वर्षांपासून भोजन घेत नसल्याचे भाजपा मंत्र्याने सांगितले आहे.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी ही शपथ घेतली आहे. राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी सांगितले की, “दहशतवादाचा नाश करण्यासाठी अन्न न घेण्याचे त्यांनी वचन दिले होते. आज याचाच परिणाम म्हणजे दहशतवाद देशात अखेरचा श्वास घेत आहे आणि त्यांची कंबर तुटली आहे.”
पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर अमेरिकेला विश्वास
राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींना केवळ राष्ट्रीय नायक नव्हे तर जगाचा नायक म्हटले. गुप्ता म्हणाले, “मोदींनी ब्राझीलला जीवनदान दिले आहे, पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर अमेरिकेला विश्वास आहे, दुसऱ्या लाटेमुळे आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: करोनाचा संसर्ग झाला असला तरी त्यांनी राज्यात वारंवार भेटी दिल्या. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि राज्यातील लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी सर्व काही पणाला लावले.”
हेही वाचा- दिल्लीत योगी सरकारने चालवला बुलडोझर; रोहिंग्यांच्या छावण्या उठवल्या, १५० कोटींची जमीन घेतली ताब्यात
माझ्या तपश्चर्येमुळे करोनाची दुसरी लाट हाताळता आली
महेश गुप्ता म्हणाले, “आज माझ्या तपश्चर्येमुळेच उत्तर प्रदेशला करोनाची दुसरी लाट हाताळता आली. करोनाच्या तिसर्या संभाव्य लाट लक्षात घेता राज्य पूर्णपणे तयार आहे. मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. सर्व आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली आहे.”
तिसरी लाट भारतात येऊ नये
राज्यमंत्री गुप्ता म्हणाले, “इतर देशांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी जागतिक साथीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले. पण आता तिसऱ्या लाटेबद्दल बोलले जात आहे, त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू आहे. पण माझी प्रार्थना आहे की तिसरी लाट आपल्या भारत आणि उत्तर प्रदेशात येऊ नये. म्हणूनच मी ‘भीष्म प्रतिज्ञा’ घेतली आहे. करोना नावाचा हा शत्रू माझ्या प्रिय भारतमधून, संपूर्ण जगापासून नष्ट होईपर्यंत मी अन्न घेणार नाही.”