बोस्टन बॉम्बस्फोटांचा धुरळा ताजा असतानाच बुधवारी रात्री शक्तिशाली स्फोटाच्या आवाजाने अमेरिका पुन्हा एकदा हादरली. टेक्सास प्रांतातील खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला. या स्फोटात १५ जण ठार तर १६० जण जखमी झाले. मात्र, स्फोटाची तीव्रता पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की सुमारे ८० किमीचा परिसर त्यामुळे हादरला. रात्रभर गावाचा आसमंत आगीच्या ज्वाळांनी भरला होता. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
टेक्सास प्रांतातील वॅको या शहरानजीक वेस्ट हे दोन हजार ८०० लोकवस्ती असलेले छोटेखानी गाव आहे. या गावालगतच वेस्ट फर्टिलायझर हा खतनिर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातच बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेसातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात प्रचंड हाहाकार उडाला. कारखान्यानजीक असलेल्या रुग्णालयात किमान १३० रुग्ण दाखल होते. त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वेस्ट गावातील अनेक नागरिकांनाही परिसरातून हटवण्यात आले. स्फोटानंतर परिसरातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तर काही घरांना आगीच्या ज्वाळांनी लपेटले. सुमारे ८० किमी परिसर या स्फोटाने हादरला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. स्थानिक प्रशासन, पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना व्ॉकोतील रुग्णालयात दाखल केले. स्फोटातील मृतांच्या संख्येबाबत मात्र संभ्रम आहे.
मृतांचा आकडा नेमका किती?
वेस्ट फर्टिलायझर कारखान्यात बुधवारी रात्री आधी आग लागली. त्यानंतर लगेचच मोठा स्फोट झाला. मात्र, या स्फोटात किमान ७० जण ठार झाल्याचा अंदाज स्थानिक माध्यमांनी व्यक्त केला. टेक्सास प्रशासनाने १५ जण ठार झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती आहे.
अणुबॉम्बच वाटला
स्फोटामुळे हादरलेल्या वेस्ट गावाचे महापौर टॉमी मुस्का यांनी तर स्फोटाची तुलना अणुबॉम्बच्या स्फोटाशीच केली. स्फोटात अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सेवासुविधा अपुऱ्या पडत असल्याचे मुस्का म्हणाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी त्यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही गावातील घरोघरी जाऊन झालेल्या नुकसानाचा अंदाज घेत आहोत असेही त्यांनी सांगितले.
इराकमध्ये असल्यासारखे वाटते
स्फोटामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका नागरिकाने आपण इराकी नागरिक असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. आपले संपूर्ण नुकसान झाल्याचेही त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा